नाशिक : (त्र्यंबकेश्वर) पुढारी वृत्तसेवा
सुप्रसिध्द ञ्यंबकेश्वर मंदिरात गर्भगृहातील त्र्यंबकेश्वराच्या पिंडीवर बर्फ जमा झाल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. मात्र हा जमा झालेला बर्फ पुजा-यांनी केलेला बनाव असल्याचे चौकशी समितीच्या पाहणीत उघडकीस आले आहे. याप्रकरणी तीघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक 30 जून 2022 रोजी पहाटेच्या सुमारास ञ्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहातील शिवपिंडीत अमरनाथ प्रमाणे बर्फ तयार झाल्याचा व्हिडीओ समाज माध्यमात प्रसिध्दीस आला होता. त्याबाबत देवस्थान ट्रस्ट प्रशासनाने हवामान खात्याचा निर्वाळा घेऊन सत्य परिस्थिती पडताळून पाहिली. त्याकरिता चौकशी समिती नेमण्यात आली. त्या चौकशी समितीच्या पाहणी मध्ये ञ्यंबकेश्वर मंदिरातील सर्व सी.सी.टी.व्ही.फुटेज पाहीले असता हा प्रकार बनावट असल्याचे निदर्शनास आले आहे.
तसा अहवाल मिळाल्यानंतर ञ्यंबक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानंतर काल (दि. 8) तत्कालीन प्रशासकीय अधिकारी रश्वी आसराम जाधव (40) रा. ञ्यंबकेश्वर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्याप्रमाणे पुजारी सुशांत तुंगार यांनी स्वत: पिशवीत बर्फ नेऊन ते पिंडीवर ठेवल्याचे व त्यावर बेलपत्र ठेवून त्याचे व्हिडीओ काढून ते समाज माध्यमात प्रसारीत केले. ञ्यंबकेश्वर देवस्थान बाबत खोटा प्रचार केला. त्यामुळे सुशांत तुंगार आणि त्यास मदत करणारे इतर दोघे आकाश तुंगार आणि उल्हास तुंगार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ञ्यंबकेश्वर येथे चर्चा घडत असून शहरातील एकाही वयोवृध्दाने त्यांच्या हायातीत शिवपिंडीवर बर्फ झाल्याचे पाहिले नव्हते अथवा ऐकले नव्हते. तेथील तापमान पाहता हे कधीही शक्य नसतांना नेमके 30 जून 2022 रोजी बर्फ कसे काय तयार झाले याबाबत शंका उपस्थित झाली होती. दरम्यान याबाबत देवस्थान ट्रस्ट प्रशासनाने जुलै महिन्यात हा प्रकार निदर्शनास आलेला असतांना देखील गुन्हा दाखल करण्यास 7 महिने उशीर का केला? असा प्रश्न होता. बहुधा यामागे हा प्रकार लपावण्याचा कल असावा असे देखील बोलले जात आहे.
सत्य अखेर बाहेर आले, मात्र उशीरा न्याय मिळाला आहे. भाविकांच्या श्रध्देशी खेळणारा हा प्रकार वेळीच उघड करण्याची अवश्यकता होती. कोटयावधी भाविकांच्या मनात गैरसमज पसरवला गेला व तो अनेक दिवस कायम ठेवण्यात आला आहे. त्याच वेळेस गुन्हा दाखल केला असता तर भाविकांच्या शंकेचे निरसन झाले असते.
कृष्णा चांदगुडे, अंधश्रध्दा निर्मुलन समिती नाशिक
हेही वाचा :