Latest

नाशिक : ‘त्या’ चिमुकलीचा खुद्द मातेकडूनच खून

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अज्ञात महिलेने बेशुद्ध करून चिमुकल्या मुलीचा गळा चिरून खून केल्याचा उच्चशिक्षित आईचा बनाव गंगापूर पाेलिसांनी उघडकीस आणला आहे. ध्रुवांशी भूषण रोकडे (तीन महिने) या चिमुकलीचा तिची आई युक्ता रोकडे हिने खून केल्याचे तपासात उघड झाले असून, पोलिसांनी युक्ताला बुधवारी (दि.२८) अटक केली आहे.

गंगापूर पोलिसांना युक्ता रोकडे हिने दिलेल्या माहितीनुसार, ४५ ते ५० वयोगटातील अज्ञात महिलेने युक्ताला गुंगीकारक पदार्थ लावून बेशुद्ध केले. त्यानंतर महिलेने चार महिन्याच्या ध्रुवांशी हिचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला, असे सांगितले हाेते. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात युक्ताच्या फिर्यादीनुसार अज्ञात महिलेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गंगापूर पोलिसांनी तपासात परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केल्यावर युक्ता हिने वर्णन केल्याप्रमाणे एकही महिला परिसरात आढळून आली नाही. त्याचप्रमाणे ती देत असलेल्या माहितीत तफावत आढळत होती. त्यामुळे पोलिसांनी सखोल तपास केला असता युक्ताचा बनाव उघड झाला. पती आणि सासूकडून त्रास दिला जात असल्याने तसेच ध्रुवांशी ही तिचे वडील आणि आजीकडे पाहून हसते व त्यांच्याकडेच जास्त वेळ राहते. ध्रुवांशी आपल्या जवळ येत नाही, यामुळे युक्ता संतापली होती. त्या संतापातून तिने ध्रुवांशीचा निर्दयीपणे गळा चिरून अज्ञात महिलेने खून केल्याचा बनाव रचला. या प्रकरणी गंगापूर पाेलिसांनी युक्ताला खुनाच्या गुन्ह्यात अटक केली आहे. युक्ताने बीएस्सी केमिस्ट्रीचे शिक्षण घेतले असून, पोटच्या मुलीचा द्वेष करत तिचा गळा चिरत खून केल्याने संताप व्यक्त होत आहे.

निर्दयीपणे गळा चिरला

युक्ताच्या सासरचे लोक ध्रुवांशी ही तिच्या वडिसांसारखी दिसते, वडिलांवर गेली आहे, असे नेहमी बोलत होते. तसेच ध्रुवांशी माझ्याकडे पाहून हसत नाही, सारखीच आजी व वडिलांकडे राहते, या कारणांमुळे युक्ताने पोटच्या मुलीचाच निर्दयीपणे गळा चिरला. त्यानंतर खुनाचा बनाव रचून तसेच चिमुकलीच्या मृत्यूनंतर ऊर बदडून, रडून सर्वांची सहानुभूती मिळवण्याचाही प्रयत्न युक्ताने केला. मात्र, पोलिस तपासात तिचे बिंग फुटले.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT