Latest

नाशिक : शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाची कामे मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गंगापूर रोडवरील पंपिंग स्टेशन रोडवर असणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाला मनपा आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासह विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी मंगळवारी (दि.१३) भेट देत पाहणी केली. मार्च २०२३ अखेरपर्यंत स्मारकातील सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

यावेळी उपआयुक्त विजयकुमार मुंढे, शहर अभियंता नितीन वंजारी, कार्यकारी अभियंता सचिन जाधव, उपअभियंता नितीन राजपूत तसेच प्रशांत बोरसे, पश्चिम विभागीय अधिकारी हरिश्चंद्र मदन आदी उपस्थित होते. आयुक्तांनी स्मारकातील कामांचा आढावा घेतला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या जागेत विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या संकल्पनेतून बाळासाहेब ठाकरे यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वावरील विविध पैलूंना अनुसरून एक सर्वसमावेशक स्मृती केंद्र व शिवसृष्टी उभारण्याचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील कामामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची आर्ट गॅलरी उभारण्याचे काम सुरू असून, आंतरराष्ट्रीय व स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

तसेच या स्मृती केंद्रात आशियातील सर्वांत मोठे अॅडव्हेंचर पार्कदेखील साकारले जाणार आहे. त्याचप्रमाणे ई-लायब्ररी (वाचनालय), ऑडिओ-व्हिडिओ सेंटर विकसित होत आहे. युवकांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी विविधी प्रकारच्या शैक्षणिक व व्यावसायिक ट्रेनिंग प्रोग्रॅमसाठी सॉफ्ट स्किल सेंटरची उभारणी होत असल्याचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी सांगितले.

किल्ल्यांचा इतिहास थ्रीडी स्वरूपात

स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात पूर्ण अद्ययावत ३०० आसनी ऑडिटोरियम, सायकल ट्रॅक व जॉगिंग ट्रॅक, सेमिनार हॉल उभारण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक किल्ले आहेत. या गडकिल्ल्यांचा इतिहास व वास्तू नव्या पिढीला कळावा. तसेच साहसी पर्यटनासाठी उपयोग व्हावा, यासाठी नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या किल्ल्यांच्या इतिहासाची माहिती थ्रीडी स्वरूपात हुबेहूब प्रतिकृती दाखवली जाणारी 'शिवसृष्टी' साकारली जाणार आहे.

ठाकरे गटात गट-तट अन‌् फाटाफूट

आगामी निवडणुका आणि सध्याच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत (ठाकरे गट) गट-तट पाहावयास मिळत आहे. पक्षश्रेष्ठींसह वरिष्ठ नेत्यांनी पक्षात कोणत्याही प्रकारचे गट-तटाचे राजकारण नसल्याचे स्पष्ट केले असले तरी आता शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकावरून शिवसेनेतच फाटाफूट पाहायला मिळत आहे. स्मारक मनपाचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या प्रभागांतर्गत असल्याने त्यांना डावलून आणि विश्वासात न घेताच वरिष्ठांच्या आदेशावरून मध्य मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्तांची भेट घेत निवेदन देऊन बोरस्ते यांनाच आव्हान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. यामुळे बोरस्ते यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT