Latest

Nashik Onion News : संतप्त कांदा उत्पादकांनी दोन तास अडवला मुंबई-आग्रा महामार्ग

गणेश सोनवणे

चांदवड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी करताच स्थानिक बाजारपेठेत कांद्याचे दर कोसळले. यामुळे संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत मुंबई आग्रा महामार्गावर उतरत तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन केले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा निषेध करत तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना निवेदन दिले. (Nashik Onion News)

सध्या, कांद्याला स्थानिक बाजारपेठेत क्विंटलला ३ ते ४ हजार रुपये बाजारभाव मिळत आहे. शुक्रवारी (दि. ८) बाजार समितीत लिलाव सुरु होताच व्यापाऱ्यांनी कांदा कमी दराने पुकारण्यास सुरुवात केली असता शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. रात्रभर थंडीमध्ये कुडकुडत लिलावाच्या प्रतीक्षेत वाट पाहात असलेले कांदा उत्पादक शेतकरी अचानक आक्रमक झाले. या सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयासमोर एकत्रीत येऊन मुंबई आग्रा महामार्गाकडे आगेकूच केली. यावेळी विविध घोषणा दिल्याने परिसर दुमुदुमून गेला.

पेट्रोलपंप चौफुली समोरील मुंबई आग्रा महामार्गावर उतरत संतप्त शेतकऱ्यांनी ठिय्या दिला. अचानक शेतकऱ्यांनी रास्तारोको केल्याने महामार्गाची वाहतूक ठप्प झाली होती. संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलना दरम्यान वाहने जाऊ लागल्याने संतप्त शेतकऱ्यांनी ती अडवली. यावेळी शाब्दिक चकमक देखील उडाली. (Nashik Onion News)

यावेळी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन आहेर, तालुकाप्रमुख विलास भवर, प्रहारचे जिल्हाप्रमुख गणेश महाले, तालुकाप्रमुख प्रकाश चव्हाण, प्रकाश शेळके, डॉ. राजेंद्र दवंडे आदींनी सरकारवर टिका केली.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT