Latest

नाशिक : जिल्ह्यात ‘एच3एन2’चा आणखी एक रुग्ण

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरापाठोपाठ आता जिल्ह्यात एच 3 एन 2 चा रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत या ठिकाणी मूळ अजमेर, राजस्थान येथील हा रुग्ण आहे. गेल्या चार दिवसांपासून सर्दी, ताप, थंडी ही प्राथमिक लक्षणे दिसून येत होती. त्यानंतर स्वॅब तपासणी केली असता एच 3 एन 2 हा विषाणू आढळून आला आहे. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, ग्रामीण आरोग्य यंत्रणा सतर्क असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहेते यांनी दिली आहे.

नाशिक शहरात यापूर्वीच चार रुग्ण एच 3 एन 2 फ्लूबाधित आढळल्यानंतर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पहिलाच रुग्ण एच 3 एन 2 बाधित आढळला आहे. त्यामुळे आता जिल्ह्याच्या एच 3 एन 2 बाधित फ्लूचे रुग्ण फेब्रुवारी महिन्यात दोन तसेच मार्च महिन्याच्या पूर्वार्धात दोन रुग्ण उपचारासांठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चारही रुग्ण शहरातच आढळल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार होऊन ते बरेदेखील झाले होते. नाशिक शहरात एकीकडे कोविडचे रुग्ण वाढत असताना एच 3 एन 2 या फ्लूचा धोकादेखील वाढला आहे. वाढत्या कोविडमुळे यंत्रणा पुन्हा कामाला लागलेली असताना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एच 3 एन 2 चे रुग्ण आढळू लागल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढणार आहे.

एच 3 एन 2 या आजारात सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी, जुलाब, उलटी यातील काही लक्षणे दिसून येतात. त्यामुळे या आजाराकडे केवळ साधा फ्लू म्हणून दुर्लक्ष करू नये. त्वरित इलाज करून घ्यावा. एच 3 एन 2 या आजाराबाबत लोकांनी घाबरून न जाता वैद्यकीय उपचार तातडीने घ्यावे. घरगुती इलाजात वेळ घालवू नये हा संसर्गजन्य आजार असल्याने घरात पसरू शकतो. – डॉ. अनंत पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT