Latest

Nashik News : कांदा निर्यातबंदीला मतदान बंदीने उत्तर 

गणेश सोनवणे

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी भूमिकेविरोधात ग्रामीण भागात असंतोष पसरत आहे. त्यातून 'ज्यांनी केली शेतमालाची निर्यातबंदी, त्यांना मतदान बंदी' असे फलक झळकू लागले आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शेलू येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी फलकाचे अनावरण केले.

केंद्र सरकारच्या निर्णयांमुळे सातत्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. टोमॅटोचे दर वधारताच सरकारने नेपाळहून टोमॅटोची आयात केली. रातोरात टोमॅटोचा बाजारभाव देशांतर्गत कोसळला. असाच कित्ता सध्या कांद्याबाबत गिरवला गेला. कांद्याला स्थानिक बाजारपेठात ३० ते ३५ रुपये किलो दर मिळत असताना केंद्राने कांदा निर्यातबंदी लादली. त्याचा बाजारभावावर परिणाम होऊन १० ते १२ रुपये किलोपर्यंत कांदादर आले. त्यातून उत्पादनखर्चदेखील वसूल होणार नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कांदा निर्यातबंदी खुली करावी, या मागणीसाठी आंदोलने केली. ती सर्व सरकारने दुर्लक्षित ठरविल्याने 'ज्यांनी केली शेतमालाची निर्यातबंदी त्यांना आता मतदान बंदी' अशा आशयाचे फलक गावागावांत झळकू लागले आहेत. चांदवड तालुक्यात याची सुरुवात शेलू या गावातून रविवारी (दि.२४) झाली.

यावेळी सचिन जाधव, भाऊराव जाधव, संजय जाधव, शिवाजी जाधव, उदय जाधव, संदीप जाधव, केशव जाधव, अशोक जाधव, बापू जाधव, नीलेश भांबर, सूर्यभान जाधव, उमेश जाधव, रामदास जाधव, भाऊसाहेब जाधव, समाधान जाधव, दत्तू जाधव, श्यामराव जाधव, प्रमोद जाधव, सचिन जाधव, अजित भांबर, रोशन जाधव आदी शेतकरी उपस्थित होते.

बी- बियाणे, रासायनिक खते, औषधे यांचे दर १० वर्षांत दहापटीने वाढले. मात्र कांद्याचे बाजारभाव आजही तेच आहेत. हंगामात कुठे आताशा बाजारभाव वधारला होता, तेव्हा लागलीच सरकारने कांदा निर्यातबंदी केली. शेतकऱ्यांच्या पोटावर मारण्याचा हा प्रकार आहे.

 भाऊराव जाधव, शेतकरी

उद्योगपती, नोकरदार, व्यापारी यांच्या हितासाठी केंद्र सरकार वेळोवेळी निर्णय घेते. मात्र, देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला सरकार कवडीमोल समजते. सर्व शेतकऱ्यांनी एकजूट होऊन आगामी निवडणुकीत केंद्र सरकारला धडा शिकवला पाहिजे.

– गणेश निंबाळकर, जिल्हाप्रमुख, प्रहार जनशक्ती

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT