Latest

Nashik News : अखेर त्या’ शाळा संचालकांविरोधात गुन्हा दाखल

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- चांदशी जलालपूर येथील श्री चैतन्य टेक्नो स्कूल ही शाळा अनधिकृत असल्याने ती शाळा बंद करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी दिल्या होत्या. नंतरही ती शाळा सुरूच असल्याने नाशिक तालुका पोलिस ठाण्यात या शाळेच्या संचालकांविरोधात मान्यता नसतानाही शाळा सुरू ठेवून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दै. 'पुढारीने' सुमारे आठ दिवसांपूर्वी "ती शाळा सहा महिन्यांपासून सुरूच" अशी बातमी प्रसिद्ध करून हा विषय सर्वांसमोर आणला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक पंचायत समितीमधील शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी दिलीप पवार यांनी श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या संचालकांविरोधात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी भा.दं.वि. ३४, ४२० आणि बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ च्या कलम १८ (५) नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. जूनमध्ये श्री चैतन्य टेक्नो स्कूल या शाळेला शासनाची कोणतीही परवानगी नसताना शाळा सुरू असल्याचे या माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांच्या निदर्शनास आले होते. अनधिकृतपणे सुरू करण्यात आलेली ही शाळा बंद करावी तसेच या शाळेविरुद्ध बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार फौजदारी गुन्हा दाखल करून या शाळेविरुद्ध एक लाख रुपये इतक्या दंडाची शिक्षा करावी. तसेच शाळेविरुद्ध प्रतिदिन १० हजार रुपये दंडाची शिक्षा करावी, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी याबाबत तपास केला असता, शाळेकडे कोणतेही मान्यतेचे पत्र नसल्याचे त्यांच्याही निदर्शनास आले.

पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संबंधित शाळेच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यासंदर्भात तपास सुरू आहे.- सारिका अहिरराव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नाशिक तालुका पोलिस ठाणे

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT