Latest

Nashik News : नाशिक ग्रामीण पोलिस अधिक्षकपदी विक्रम देशमाने, शहाजी उमाप यांची बदली

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– नाशिक ग्रामीणचे पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांची मुंबईत अपर पोलिस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. गृह विभागाने भारतीय पोलिस सेवेतील व राज्य पोलिस सेवेतील ४४ अधिकाऱ्यांच्या बुधवारी (दि.३१) बदल्या केल्या. त्यात शमाजी उमाप यांची बदली करण्यात आली असून त्यांच्याजागी ठाण्याचे अधीक्षक विक्रम देशमाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांची बदली केली असून त्यांचा पदभार दत्तात्रय कराळे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

नाशिकचे अधीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे मुंबईतील विशेष शाखेच्या अपर आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर त्यांचा पदभार विक्रम देशमाने यांच्याकडे देण्यात आला. देशमाने यांनी याआधी २०१२ ते २०१३ या कालावधीत नाशिक ग्रामीणमध्ये अपर पोलिस अधिक्षक पदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यामुळे त्यांना नाशिक ग्रामीणची माहिती असल्याने आगामी निवडणुकीत पोलिसांना त्याचा जास्त फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विशेष पोलिस महानिरीक्षकपदी कराळे

नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी ठाणे शहरात सहआयुक्त दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती केली आहे. कराळे यांनी याआधी २०१६ ते २०१७ मध्ये नाशिक शहरात गुन्हे शाखेचे उपआयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळली होती. तसेच डॉ. बी. जी. शेखर पाटील यांची नियुक्ती अद्याप पदस्थापना दिलेली नसून त्यांच्या नियुक्तीचे स्वतंत्र आदेश काढण्यात येतील असे गृहविभागाने म्हटले आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT