Latest

Nashik MVP Marathon : उत्तर प्रदेशचा अक्षय कुमार मविप्र मॅरेथॉनचा विजेता

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे आयोजित आठव्या राष्ट्रीय व १३ व्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉन (Nashik MVP Marathon) २०२४ स्पर्धेचे विजेतेपद उत्तर प्रदेशच्या अक्षय कुमार याने पटकावले. त्याने २ तास २६ मिनिटे १ सेकंद वेळेत स्पर्धा पूर्ण करत एक लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले. महिला गटात २१ किमीच्या शर्यतीत रिंकू सिंगने बाजी मारली. नाशिकच्या बसंती हेमब्रोमने १० किमी मॅरेथॉनचे जेतेपद पटकावले. विविध १४ गटांतील विजेत्यांसह सहभागी धावपटूंना स्पर्धा पूर्ण केल्यानंतर पदक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी एकूण सात लाख १६ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात आली.

तत्पुर्वी कडाक्‍याच्या थंडीत पहाटे 5.45 पासून स्पर्धेला सुरुवात झाली होती. कडाक्‍याच्या थंडीतही धावपटूंचा उत्साह कायम होता.१४ गटांत झालेल्या या स्पर्धेत चिमुकल्यांपासून ज्येष्ठ धावपटूंनी सहभाग नोंदविला. ४२ किलोमीटर पूर्ण मॅरेथॉनने स्पर्धेची सुरुवात झाली. भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व केलेले आंतरराष्ट्रीय हॉकीपटू मीर रंजन नेगी, मॅरेथॉन स्पर्धेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष व मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार, संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी हिरवा झेंडा दाखवत मॅरेथॉनला सुरुवात केली. यावेळी उपाध्यक्ष विश्वास मोरे, चिटणीस दिलीप दळवी, उपसभापती देवराम मोगल, संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. (Nashik MVP Marathon)

बक्षीस वितरण समारंभात बोलताना मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी मविप्र मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीतेसाठी अत्यंत सूक्ष्म व काटेकोर नियोजन केले होते. स्पर्धा मार्ग मापनापासून ते स्पर्धा पूर्ण होईपर्यंत प्रत्येकाने आपली जबाबदारी सक्षमपणे पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काळात ही मॅरेथॉन आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याकरिता प्रयत्न करू. संस्थेच्या माध्यमातून स्पोर्ट्स अकॅडमी उभारण्याचाही प्रयत्न असून, त्यासाठी मीर रंजन नेगी यांचे सहकार्य व मार्गदर्शन घेऊ, असे सांगितले. यावेळी अध्यक्ष सुनील ढिकले यांनी खेळाडूंचे निवास, भोजन तसेच आरोग्य सुविधा देणारी ही राज्यातील एकमेव मॅरेथॉन असल्याचे सांगितले.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त झालेल्या रक्तदान शिबिरात सर्वोच्च सहभागाबद्दलचे प्रथम पारितोषिक कर्मवीर ॲड. बाबूराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाला, तर द्वितीय पारितोषिक केटीएचएम महाविद्यालयाला, तृतीय पारितोषिक कर्मवीर गणपतदादा मोरे निफाड महाविद्यालयाला देण्यात आले. स्पर्धा निरीक्षक म्हणून वैजनाथ काळे व संदीप फुगट यांनी काम पहिले. प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर यांनी मीर रंजन नेगी यांचा व स्पर्धा संयोजक प्रा. हेमंत पाटील यांनी स्पर्धा निरीक्षकांचा परिचय करून दिला. या वर्षीचा क्रीडा पत्रकार पुरस्कार क्रीडा पत्रकार प्रशांत केणी यांना प्रदान करण्यात आला. (Nashik MVP Marathon)

८६ वर्षीय तरुण वृद्धांचा समावेश

यावेळी मॅरेथॉन समितीने ७५ पुढील वयोगट कमी केला होता. मात्र तरीही जिल्ह्यातील बाळकृष्ण अलई यांच्यासह त्यांचे दोन ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे सहकारी यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.

गटनिहाय प्रथम क्रमांकाचे विजेते

४१ किमी – अक्षय कुमार – उत्तर प्रदेश

२१ किमी – रिंकू सिंग – उत्तर प्रदेश

१० किमी महिला खुला वर्ग – बसंती हेमब्रोम – नाशिक

१० किमी पुरुष खुला गट – दयानंद चौधरी – हर्सूल- नाशिक

१२ किमी – २५ वर्षाआतील मुले – अतुल बर्डे – देवळाली कॅम्प

१० किमी – १९ वर्षाआतील मुले – देवीदास गायकवाड – दिंडोरी

५ किमी – १७ वर्षाआतील मुले – प्रवीण चौधरी – नाशिक

५ किमी – १९ वर्षाआतील मुली – रिंकू चौधरी – नाशिक

४ किमी – १४ वर्षाआतील मुले – चैतन्य श्रीखंडे – जि. प. स्कूल, मोहरा

४ किमी – १७ वर्षाआतील मुली – वंदना तुंबडे – नाशिक

३ किमी – १४ वर्षाआतील मुली – रूपाली सोनवणे – येवला

६ किमी – २५ वर्षाआतील मुली – आरती पावरा – धुळे

४ किमी – ६० वर्षांवरील पुरुष – केशव मोटे

५ किमी – ३५ वर्षांवरील महिला – अश्विनी देवरे – नाशिक

फुल मॅरेथॉन विजेत्यांमध्ये नाशिकचे वर्चस्व

४२ किमी अंतराच्या फुल मॅरेथॉनमध्ये उत्तर प्रदेशच्या अक्षय कुमारने प्रथम क्रमांक मिळवला असला, तरी या स्पर्धा प्रकारात नाशिकच्या धावपटूंचे वर्चस्व दिसून आले. यामध्ये ११ पैकी एकूण सात विजेते नाशिकचे होते. त्यामुळे भविष्यात नाशिकच्या खेळाडूंना मॅरेथॉनमध्ये चांगले दिवस असतील.

गेल्या पाच महिन्यांपासून नाशिकमध्ये मॅरेथॉनसाठी सराव करत आहे. त्यामुळेच हे यश मिळाले. मूळचा उत्तर प्रदेशचा असल्याने येथील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी मी नाशिकला प्राधान्य दिले. नाशिकचे वातावरण खेळाडूंसाठी पोषक आहे. मॅरेथॉन जिंकल्याने कष्टाचे चीज झाले आहे. प्रथमच फुल मॅरेथॉनमध्ये यश प्राप्त केल्याने खूप आनंद वाटत आहे. – अक्षय कुमार, मविप्र मॅरेथॉन विजेता.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT