नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा
इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा येथे विहिरीत बुडून कर्जत तालुक्यातील ताजु येथील मेंढपाळ मायलेकींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पिंपळगाव डुकरा येथील शेतकरी अरुण शंकर भगत यांच्या शेतातील विहीरीत (दि. 2) दुपारच्या सुमारास मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या पपाबाई राजेंद्र गोयकर (35), मोनिका राजेंद्र गोयकर (15) या दोघी मायलेकींचा बुडून मृत्यू झाला.
मोनिकाचा पाय घसरुन ती पाण्यात पडली असता तिला वाचवण्यासाठी आई पपाबाई गेल्या, मात्र यात दोघांचाही बुडून मृत्यू झाला. प्रसंगी पपाबाई यांच्या मुलाने यावेळी गावातील लोकांना मदतीसाठी बोलावले. माजी पोलीस पाटील कचरू वाकचौरे यांनी तात्काळ वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनला कळवले. यावेळी पोलीस हवालदार विलास धरणकर यांनी गोविंद तुपे यांना बुडालेले मृतदेह काढण्यासाठी बोलवले. त्यांनी पाण्याचा अंदाज घेऊन मायलेकींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मायलेकींचे मृतदेह घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. यावेळी पोलीस राजु पाटील, विलास धारणकर, मौले आदी उपस्थित होते.