Latest

नाशिक : लासलगाव पाणी प्रश्नी बैठक निष्फळ; नागरिक मतदान बहिष्कारावर ठाम

अंजली राऊत

लासलगाव : वृत्तसेवा
लासलगाव येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी शनिवारी (दि. ११) लासलगाव बंदची हाक दिली असून लोकसभा मतदानावरील बहिष्कार कायम ठेवला आहे.

गुरुवारी (दि. ९) लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयात एमजीपीचे उपअभियंता व्ही. व्ही. निकम व शाखा अभियंता पी. एस. पाटील यांच्या समवेत झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. ही योजना एमजीपीने चालवण्यास घ्यावी या योजनेच्या आतापर्यंत झालेल्या कामाची चौकशी करावी. नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी लेखी हमी द्यावी व पाणीपुरवठा योजनेचे सोलर पॅनल तत्काळ सुरू करावे, असे मुद्दे मांडण्यात आले. मात्र, यात कोणताही तोडगा न निघाल्याने शेवटी नागरिकांनी शनिवारी लासलगाव बंदची हाक दिली आहे. तसेच या प्रश्नी जोपर्यंत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष घालत नाही तोपर्यंत लाेकसभा मतदानावर बहिष्कार निर्णयावर ठाम राहण्याचा निर्धार केला आहे.

सदर पाणी पुरवठा योजनेचे काम जलद गतीने चालू आहे. 77 टक्के काम पूर्ण झाले आहे. ही योजना 2012 साली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने समितीकडे वर्ग केली आहे. पुन्हा ताब्यात घेण्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेतले जाईल. – व्ही. व्ही. निकम, उपअभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.

यावेळी दिल्ली येथील निवडणूक कार्यालय, मुंबई निवडणूक कार्यालय, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयाला मतदान बहिष्काराबाबत इमेल केला आहे. या बैठकीत सुवर्णा जगताप, दत्ता पाटील, संदीप उगले, राजेंद्र कराड, राजेंद्र चाफेकर, गणेश जोशी, स्मिता कुलकर्णी, स्वाती जोशी, बाळासाहेब सोनवणे यांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी महेंद्र हांडगे, विकास कोल्हे, नितीन शर्मा, चंद्रकांत नेटारे, शेखर कुलकर्णी, अक्षदा जोशी, भूपेंद्र जैन, दिलीप सोनवणे, गोटू बकरे ,सोनम बांगर, सणा शेख, स्वाती रायते, मंदा गोरे, सुवर्णा जाधव यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

आमच्याकडे २० दिवसांपासून नळाला पाणी आलेले नाही. सर्वत्र टंचाई असल्याने पैसे देऊनही पाणी टँकर मिळत नाही. पाण्याच्या प्रश्नाला आम्ही त्रस्त झालो असून लवकरच सुरळीत पाणीपुरवठा ग्रामपंचायतने करावा ही अपेक्षा. – स्वाती जोशी, लासलगाव.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT