Latest

नाशिक| ‘विशेष मिशन इंद्रधनुष 5.0’ची प्रभावी अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे निर्देश

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. केंद्र सरकारने ऑगस्टपासून 3 फेऱ्‍यांमध्ये सर्व जिल्हा, महापालिकांमध्ये "विशेष मिशन इंद्रधनुष 5.0" कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यंत्रणांना दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (दि.२५) आयोजित जिल्हा समन्वय समिती बैठकीप्रसंगी जलज शर्मा बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा प्रजनन व बालआरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहेते, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. प्रकाश नांदापूरकर यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शर्मा पुढे म्हणाले, अर्धवट लसीकरण झालेले किंवा लसीकरण न झालेल्या बालकांची प्रतिकारशक्ती ही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांपेक्षा कमी असते. त्यामुळे ते लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात. त्या अनुषंगाने केंद्र सरकारने डिसेंबरपर्यंत गोवर रुबेला आजाराचे निर्मूलन करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. त्‍यासाठी केंद्राने तीन फेऱ्यांमध्ये विशेष मिशन इंद्रधनुष 5.0 मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी करताना कोणीही बालक अथवा गरोदर माता वंचित राहणार नाही, यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना शर्मा यांनी केल्या.

डॉ. सुधाकर मोरे यांनी मोहिमेबाबत माहिती देताना लसीकरणपासून पूर्णपणे वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालक व गरोदर मातांचा घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात आला आहे. उर्वरित गरोदर माता व बालकांचे लसीकरण या मोहिमेंतर्गत करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. मोहिमेचा पहिला टप्पा 7 ते 12 ऑगस्ट, दुसरा टप्पा 11 ते 16 सप्टेंबर व तिसरा टप्पा 9 ते 14 ऑक्टोबर या काळात राबविण्यात येईल. लसीकरण सत्राचे नियोजन शहरी आणि ग्रामीण भागात केले जाणार असून, सर्व सत्रे यु-विन ॲपवर केली जातील, असे डॉ. नेहेते यांनी सांगितले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT