नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा- मुंबईहून थेट नाशकात ड्रग्स विक्री करणाऱ्या एका संशयितास त्याच्या चार साथीदारांसह एमआयडीसी चुंचाळे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ड्रग्जसह लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
यासंदर्भात पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी माहिती दिली आहे, एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकीच्या हद्दीत अंबड एक्सलो पॉईंटजवळ ठाण्यातील मुम्ब्रा येथून एकजण मॅफेड्रॉन (एमडी) या अंमली पदार्थाची स्थानिक व्यक्तीस विक्री करण्याकरिता येणार असल्याबाबत पोलीस शिपाई कु-हाडे यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, पोलीस उपआयुक्त मोनिका राउत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुगले, गुन्हेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांच्यासह इतर पोलिस साथिदारांनी एक्सलो पॉईन्ट येथे साफळा रचला.
दरम्यान यावेळी, संशयित मुस्ताक शेख उर्फ भुऱ्या (रा. पवननगर सिडको) याच्यासह चौघे संशयीत इसम बोलताना दिसले. त्याचवेळी एकजण पाकीट घेउन दुसऱ्यास पैसे देतांना दिसला म्हणून तपास पथकाने त्यांच्यावर छापा मारून कारवाई केली. यावेळी त्यांच्याकडून २७.५ ग्रॅम एमडी व रोख रक्कम असा एकुण ३ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या संशयिताना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २९ जानेवारी पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. गोवंडी येथे राहणारे चारही संशयित मुंब्रा ठाणे येथून रिक्षाने एक्स्लो पॉईन्ट येथे आले होते. पुढील तपास पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदिप पवार व दिनेश नेहे हे करीत आहेत.
हेही वाचा :