Latest

Nashik Drug Case : मध्यरात्रीपासून गिरणा नदीत शोधमोहिम, आतापर्यंत काय लागलं हाती?

गणेश सोनवणे

देवळा(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा : नाशिकमधील कारखाण्यातून हस्तगत करण्यात आलेल्या तीनशे कोटीच्या ड्रग्ज प्रकरणातील धागेदोरे देवळा तालुक्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत. काल, 23 ऑक्टोबर रोजी, अंधेरी येथील साकी नाका पोलिसांनी ड्रग्ज माफिया ललित पाटील यांचा चालक संशयित सचिन वाघ याला अटक केली. त्याची चौकशी केल्यानंतर, मुंबई पोलिसांना देवळा तालुक्यातील सरस्वतीवाडी येथे ड्रग्ज लपवल्याची त्याने कबुली दिली.

वाघ याने लोहोणेर येथील गिरणा नदीत ड्रग्ज नष्ट केल्याचे सांगितले. त्यामुळे, काल, 23 ऑक्टोबर रोजी, साकी नाका पोलिसांनी सरस्वतीवाडी ता. देवळा येथे धाड टाकून वाघ याच्या नातेवाईकाकडून काही माल हस्तगत केल्याचे समजते. त्याबाबत एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. पहाटे साडेतीन वाजेपासून गिरणा नदी पात्रातील पाण्यात रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले. सकाळी दहा वाजेपर्यंत त्यांना गिरणा नदी पात्रात नष्ट केलेला माल आढळून आला नाही.

याबाबत स्थानिक पोलिसांच्या मदतीने साकी नाका पोलीस पथक देवळा तालुक्यात कसून चौकशी करीत आहे. ललित पाटील यांचा चालक सचिन वाघ हा देवळा तालुक्यातील वाखारी पिंपळ गाव येथील असल्याचे सांगण्यात येते आहे. तर सरस्वतीवाडी येथील संशयित आरोपी वाघ याचा नातेवाईक असल्याचे सांगण्यात येते आहे. या घटनेबाबत साकी नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा पोलीस ठाण्याचे सपोनि दीपक पाटील व सहकारी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

या घटनेची माहिती मिळताच देवळा तालुक्यातील नागरिकांनी सकाळपासून गर्दी केल्याने पुलावर दोन्ही बाजूला वाहनांची मोठी रांग लागली होती.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT