Latest

Nashik Drought News : भूजल पातळी घसरली, यंदा जानेवारीपासूनच दुष्काळाच्या झळा

गणेश सोनवणे

मोसमात पावसाने दिलेला झटका आणि वाढते तापमान यामुळे नाशिक जिल्ह्यातील पाण्याची पातळी फारच घटली आहे. जिल्ह्याच्या भूजल पातळीचा सप्टेंबरअखेरचा अहवाल भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागामार्फत प्रसिद्ध झाला असून, यामुळे जिल्ह्याला यंदा दुष्काळाच्या झळा जानेवारी महिन्यातच बसायला लागण्याची शक्यता आहे. याला प्रमुख कारण यंदा जूनच्या सुरुवातीपासूनच पावसाने उघडीप दिली होती. परतीचा पाऊस झाला, मात्र त्यामु‌ळे भूजल पातळीत फारशी वाढ झाली नाही. (Nashik Drought News)

जिल्ह्यातील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने जिल्ह्यातील एकूण १८४ विहिरींच्या भूजल पातळीचे निरीक्षण केले. निरीक्षणातून भूजल पातळी अहवाल जाहीर करण्यात आला असून, जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी ११ तालुक्यांतील भूजल पातळीत सप्टेंबरअखेरीसच मोठी घट झाली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

जिल्ह्यातील भूजल दुष्काळ निर्देशांक सौम्य वाढीच्या प्रकारात ५४ पैकी ४५ तालुके आहेत. मध्यम गटात सात, तर गंभीर गटात दोन तालुक्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील केवळ तीन तालुक्यांमधील भूजल पातळी समाधानकारक आढळली आहे. त्यात चांदवड, मालेगाव, येवला या तीन तालुक्यांतील भूजल पातळी मोठ्या प्रमाणात घटली असल्याचे सप्टेंबरअखेरच्या पातळीत सरासरी पाऊण मीटरने कमी होऊन यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जानेवारी २०२४ अखेर पुन्हा एकदा विहिरींचे निरीक्षण करून अहवाल प्रसिद्ध होईल, तेव्हा नव्याने भूजल पातळी समोर येईल.

टंचाई आराखडा सादर (Nashik Drought News)

यंदाच्या मोसमात जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यासोबतच आता झालेल्या गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. याचा मोठा परिणाम जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांसह इतर तालुक्यांना बसणार असून, जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने जिल्ह्यातील दोन हजार १६२ गावे तसेच वाड्या, वस्त्या यांना पाणीपुरवठा करण्यासाठी १८ कोटी २२ लाखांचा टंचाई आराखडा तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केला आहे.

तालुकाभूजल पातळी (मी.)
बागलाण-1.11
चांदवड-2.13
देवळा0.10
दिंडोरी-0.05
इगतपुरी-0.10
कळवण-1.20
मालेगाव-1.24
नांदगाव-0.18
नाशिक0.28
निफाड-1.28
पेठ0.02
सिन्नर0.46
सुरगाणा-0.36
त्र्यंबकेश्वर-0.19
येवला-0.70
SCROLL FOR NEXT