Latest

नाशिक : वैद्यकीय क्षेत्राला कट प्रॅक्टिसची कीड – गिरीश महाजन

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वैद्यकीय क्षेत्राकडे सेवाभाव म्हणून पाहिले जाते. डॉक्टरांना देवाचे दुसरे रूप मानण्यात येते. पण, काही व्यक्तींमुळे समाजाचा वैद्यकीय क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असून, कट प्रॅक्टिस ही या क्षेत्राला लागलेली कीड आहे, अशी खंत वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा आरोग्य विद्यापीठाचे प्र-कुलपती गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. कट प्रॅक्टिसविरोधात राज्यामध्ये कायदा करत त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 22 वा दीक्षान्त समारंभ सोमवारी (दि. 13) ना. महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झाला. विद्यापीठ मुख्यालयात झालेल्या सोहळ्याप्रसंगी पुणे विद्यापीठाचे प्रा. डॉ. भूषण पटवर्धन हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर कुलगुरू लेफ्टनंट जनरल (नि.) डॉ. माधुरी कानिटकर, प्रति-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. अजित गोपछडे, डॉ. सुरेश पाटणकर, वित्त व लेखाधिकारी एन. व्ही. कळसकर आदी उपस्थित होते. ना. गिरीश महाजन म्हणाले की, कट प्रॅक्टिसविरोधात कायदा आणण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. केंद्र शासनाकडे याबाबत पाठपुरावा केला जातोय. राज्यात हा कायदा लागू करताना त्याची कठोर अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले. आरोग्य क्षेत्रातील काम हे निश्चितच आव्हानात्मक असून, या क्षेत्रात कार्यरत सर्वांनीच सकारात्मतेची जोपासना करावी. डॉक्टर आणि रुग्ण व त्यांचे नातेवाईक यामध्ये होणारे कटूप्रसंग टाळण्यासाठी उत्तम संवाद राखताना आरोग्यसेवेमध्ये रुग्णासमवेत सामाजिक बांधिलकीची जोपासना करणे गरजेचे असल्याचे मत ना. महाजन यांनी व्यक्त केले. विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांचे शासनाकडे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. डॉ. भूषण पटवर्धन यांनी मनोगतात सांगितले की, बदलत्या लाइफस्टाइलमुळे उद्भवणार्‍या आजारांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. या आजारांवर एकाच पॅथीकडे उपचार नाही. सर्वच उपचार पद्धतींमधील वेगवेगळ्या गोष्टींचा समुच्चय करून या आजारांवर मात करणे शक्य असल्याचे ते म्हणाले. डॉ. कानिटकर यांनी विद्यापीठातील उपक्रमांची माहिती देताना, येत्या दोन वर्षांत विद्यापीठ प्रशासनाचे कामकाज पेपरलेस करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल तोरणे यांनी सूत्रसंचालन केले, तर परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी आभार मानले. समारंभास विद्यापीठ विद्याशाखांचे अधिष्ठाता विविध प्राधिकरण सदस्य, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रांतील मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

12,727 स्नातकांना पदवी
आरोग्य विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासियता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या 12 हजार 727 स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. विविध विद्याशाखांमध्ये गुणवत्ता प्राप्त केलेल्यांना 96 विद्यार्थ्यांना 124 सुवर्णपदक, एका विद्यार्थ्यास रोख रक्कम पारितोषिक व संशोधन पूर्ण केलेल्या 17 विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.

विद्याशाखेनिहाय विद्यार्थी
आधुनिक वैद्यक विद्याशाखा पदवीचे 237, दंतचे 2108, आयुर्वेदचे 3392, युनानीचे 339, होमिओपॅथीचे 2145, बेसिक बीएस्सी नर्सिंगचे 1957, पीबीबीएस्सी नर्सिंगचे 213, बीपीटीएचचे 193, बीओटीएचचे 23, बीपीओचे 1 तसेच पदव्युत्तर विद्याशाखेत एमडी मेडिकलचे 257, पीजी दंत 482, पीजी आयुर्वेद 42, पीजी होमिओपॅथी 227, पीजी युनानी 1, पीजी डीएमएलटी 91, पॅरामेडिकल 717, पीजी अलाइड (तत्सम) 158 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

मी मूळची मुंबई येथील आहे. ऑब्सेटिक व गायनॉकोलॉजिस्टमध्ये प्रावीण्य मिळविले आहे. कॉलेजमधून मिळालेले ज्ञान व अभ्यासामधील सातत्याच्या जोरावर हे यश संपादित केले. -श्रीविद्या व्यंकटेश्वरन, सुवर्णपदक विजेती, जीएस कॉलेज, मुंबई.

सातार्‍याचा अमेय माचवे ठरला टॉपर
मूळ सातार्‍याचा असलेला व मुंबईतील सेठ जी. एस. मेडिकल कॉलेजचा अमेय माचवे टॉपर ठरला. त्याने विविध विषयांत अव्वल स्थान प्राप्त करत पाच सुवर्णपदकांवर नाव कोरले. अमेयचे बारावीपर्यंतचे शिक्षण सातार्‍यात झाले. मुंबईत त्याने पुढील शिक्षण घेतले. तो उत्तम खेळाडू आहे. अमेयचे आई-वडील दोघेही डेंटिस्ट असून, ते सातार्‍यात प्रॅक्टिस करतात. सुयोग्य नियोजन, सातत्य, पालकांचे व गुरुजनांचे मार्गदर्शन या जोरावर यश संपादित केल्याची भावना अमेयने व्यक्त केली. वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्याचा मानस अमेयने व्यक्त केला. अमेयने वैद्यकीय क्षेत्राकडे व्यवसाय म्हणून न बघता सेवाभावी वृत्ती अंगीकारावी, अशी अपेक्षा त्याची आई डॉ. अर्चना माचवे यांनी व्यक्त केली.

कॉलेजमधील प्राध्यापकांचे मार्गदर्शन, नियमित लेक्चर्स हे यशामागील गमक आहे. कॉलेजला नियमित उपस्थित राहिल्याने रुग्णतपासणी करण्याची संधी मिळाली. परीक्षेत त्याचा फायदा झाला. मूळचा मी वाराणसीचा असून, माझे वडील वकील तसेच आई व्यवसायिक आहे. – सौमित्र गिनोडिया, सुवर्णपदक विजेता, जीएस कॉलेज, मुंबई

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT