Latest

नाशिक : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात सीआरपीएफ दाखल

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लोकसभा निवडणुकीतील मतदानासाठी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार अतिरिक्त पोलिस फौजफाटाही मागवण्यात आला आहे. त्यानुसार शहरात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) पाच तुकड्या दाखल झाल्या आहेत. तर आणखी दोन तुकड्या शहरात दाखल होणार आहेत. एका तुकडीत १०० जवानांचा फौजफाटा असल्याने पोलिसांना अतिरिक्त बळ मिळणार आहे.

लोकसभा निवडणुकीमुळे शहरात बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. त्यानुसार पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, उपायुक्त प्रशांत बच्छाव व सहायक आयुक्त संदीप मिटके हे बंदोबस्ताचे नियोजन करीत आहेत. परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत यांनी हद्दीतील सर्व मतदान केंद्रांसह सुरक्षा व्यवस्थेचा अहवाल सादर केला आहे. शहर पोलिस दलातील फौजफाट्यासह अतिरिक्त पोलिसांची गरज असल्याने पोलिसांनी गृहविभागाकडे मागणी केली होती. त्यानुसार शहरात राज्यभरातून पोलिस फौजफाटा दाखल होणार आहे. बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलिसांच्या निवासासह भोजनाची व्यवस्था मुख्यालयाचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. दरम्यान, नाशिकमध्ये सीआरपीएफच्या पाच तुकड्या हजर झाल्या आहेत, तर सीआयएसएफची तुकडी एक महिन्यापासून शहरात आहे. यासह अतिरिक्त मनुष्यबळ दाखल होणार आहे.

असा असेल अतिरिक्त बंदोबस्त
शहरात केंद्रीय व राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या दाखल झाल्या आहेत व येत्या दोन दिवसांत आणखी तुकड्या हजर होणार आहेत. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची (सीआयएसएफ) तुकडीही शहरात आहे. बंदोबस्तासाठी शहरात एक हजार होमगार्ड तसेच दंगल नियंत्रण, जलद प्रतिसाद पथक, राज्यभरातून २५ अधिकाऱ्यांचा फौजफाटा व ४७० कर्मचाऱ्यांची कुमक शहरात दाखल होणार आहे.

सहायक आयुक्तांकडे एक तुकडी
शहरात दाखल झालेल्या सीआरपीएफ व एसआरपीएफच्या तुकड्या प्रत्येक सहायक आयुक्तांच्या कार्यालयीन पथकासमवेत असतील, तर एक तुकडी मुख्यालयात असेल. मतदानावेळी फिरते पथक, गस्ती पथक, संवेदनशील ठिकाणे, स्ट्राँग रूम आदी महत्त्वाच्या ठिकाणी सशस्त्र बंदोबस्त असेल. सहायक आयुक्तांची पथके हद्दीत सकाळी 6 पासून सायंकाळी मतदान संपेपर्यंत गस्त घालणार आहेत.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT