नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सध्या महाविद्यालये, कोर्ट कचेऱ्यांजवळील कॉपी सेंटरवर गर्दी वाढत चालली आहे. झेरॉक्स करत असताना सेंटरच्या संगणकावर जर प्रिंट साठी फाइल कॉपी करत असाल तर काम झाल्यावर ती फाइल संबंधित संगणकावरून डिलीट करण्याचे विसरू नका; अन्यथा त्या फाइलचा विनापरवानगी कुठेही वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्याच्या काळात अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांसोबतच कागदपत्रे हीदेखील महत्त्वाची गरज निर्माण झाली आहे. कागद असेल तर तेच सत्य अशी परिस्थिती आजकाल झालेली आहे. चलतीचा व्यवसाय म्हणून कॉपी सेंटरकडे बघितले जाते. आज शहरात अनेक चौकाचौकांत कॉपी सेंटर सुरू झाले आहेत. राजस्थानी लोकांनी या दुकानांचा ठेका मोठ्या प्रमाणावर घेतला असून, शहरातील महत्त्वाच्या महाविद्यालय परिसर, शासकीय कार्यालय आवार या सर्व ठिकाणी ही सेंटर सुरू केलेली आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनाही पटकन झेरॉक्स किंवा प्रिंट काढायची असेल तर या ठिकाणी सुविधा उपलब्ध होत असते. झेरॉक्स किंवा प्रिंट काढायची असल्यास सेंटरवर विविध प्रकारच्या सुविधा देण्यात आलेल्या यामध्ये प्रामुख्याने असतात. संगणकावर पेन ड्राइव्ह, ई-मेल आणि व्हॉट्सॲपवर फाइल देऊन प्रिंट काढली जात असते. मात्र, प्रिंट हातात आल्यावर पैसे देऊन झाल्यावर आपल्या कागदपत्रांची सुरक्षितता काय, असा प्रश्न सहसा मनात येत नाही. नागरिकांनी वेळीच संबंधित फाइल काम झाल्यावर लगेच डिलीट करणे अपेक्षित असते; अन्यथा आपल्या कागदपत्रांचा विनापरवानगी गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबतीत होण्यासोबतच झेरॉक्स सेंटरवर देखील काही नियम अटी घालण्याचीदेखील गरजेचे आहे. नागरिकांच्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनी वेळीच जनजागृती सावध होत आपले कागदपत्रे सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरून आपल्या मूलभूत अधिकारांवर गदा येणार नाही.