Latest

‘दलित’ नव्हे आता ‘पीपल्स पँथर’; नामकरणावर नागपुरातील बैठकीत शिक्कामोर्तब

अविनाश सुतार

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : साधारणतः चार दशकांपूर्वी राज्य गाजवणाऱ्या दलित पँथर च्या पुनर्गठन प्रक्रियेत संघटनेचे नामकरण आता 'पीपल्स पँथर' असे करण्यात आले आहे. पँथरचे मुख्य संयोजक अशोक मेश्राम व अन्य नेत्यांच्या उपस्थितीत रवीभवनात झालेल्या बैठकीत 'पीपल्स पँथर' या नावावर शिक्कामोर्तब केले.

गेले काही दिवस ही पुनर्गठन प्रक्रिया सुरू आहे. यंदा पँथरचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून विदर्भात पुनर्गठनाची प्रक्रिया दोन महिन्यांपासून सुरू झाली. जुन्या, नवीन नेत्यांनी विदर्भाचा आढावा दौरा केल्यानंतर उपराजधानीत बैठक घेतली. यात 'पीपल्स' असे नाव बदलण्यासोबतच संघटनेच्या नामांतरावर शिक्कामोर्तब केले गेले. याविषयीची माहिती मुख्य संयोजक अशोक मेश्राम यांनी दिली.
रविभवन बैठकीत जाहीरनामा समिती स्थापन करण्यात आली. कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी अशोक मेश्राम यांची तर सरचिटणीसपदी डॉ. भीमराव मस्के आणि उपाध्यक्षपदी गोविंद मेश्राम यांची निवड करण्यात आली.

विशेष म्हणजे या संघटनेचा कुणाशीही राजकीय संबंध नाही. सर्व समाजाला एकत्र आणणे हा मुख्य उद्देश ठेवण्यात आला आहे. रिपब्लिकन पक्षाच्या कोणत्याही गटाचे नेते, कार्यकर्ते यात सहभागी होऊ शकतात. त्यांना त्यांची राजकीय ओळख कायम ठेवता येईल. तूर्तास पीपल्सने परिवर्तनाची भूमी असलेल्या विदर्भावर लक्ष केंद्रित केले आहे. संघटनेला गतवैभव प्राप्त झाल्यास भविष्यात निवडणुका लढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही अशोक मेश्राम यांनी यावेळी प्रकर्षाने स्पष्ट केले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT