Latest

तब्बल 75 उद्यानांना नगरसेवकांच्या नातेवाइकांची नावे; आयुक्तांनी मागविली माहिती

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या पैशातून साकारलेल्या 210 उद्यानांपैकी  दिल्याचे समोर आले आहे. उद्यानांना पर्यावरण आणि वनस्पतीतज्ज्ञांची नावे देण्याच्या मुख्यसभेच्या मंजूर ठरावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी मूठमाती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आयुक्त विक्रम कुमार यांनी उद्यान आणि नगरसचिव विभागाकडून याबाबत माहिती मागविली आहे.

शहरातील नागरिकांसाठी महापालिकेच्या निधीतून शहरात विविध ठिकाणी उद्याने साकारली जातात. ही उद्याने नगरसेवकांच्या निधीसह मालमत्ता आणि उद्यान विभागाकडून साकारली जातात. मालमत्ता किंवा नगरसेवकांच्या निधीतून साकारलेली उद्याने सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर उद्यान विभागाच्या ताब्यात दिली जातात.

दरम्यान, महापालिकेच्या उद्यानांना पर्यावरण आणि वनस्पतीतज्ज्ञ आणि ज्येष्ठ नेत्यांची नावे देण्याचा ठराव महापालिकेच्या मुख्य सभेने 2000 साली एकमताने मंजूर केला होता. त्यानंतर मात्र सर्वपक्षीय नगरसेवकांनी नाव समितीच्या माध्यमातून या उद्यानांना आपल्या नातेवाइकांची नावे देण्यातच धन्यता मानल्याचे समोर आले आहे.

घरात पहिल्यांदाच नगरसेवकपद आलेल्या नगरसेवकांनी सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रात कसलेही कार्य नसलेल्या, शासकीय नोकरी करून निवृत्त झालेल्या आपल्या नातेवाइकांची नावे उद्यानांना दिली आहेत. गेल्या वीस वर्षांत महापालिकेच्या 210 उद्यानांपैकी 75 उद्यानांना नगरसेवकांच्या नातेवाइकांची नावे दिल्याचे उजेडात आले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी उद्यान विभाग आणि नगरसचिव विभागाकडून याबाबत माहिती मागविली आहे.

सॅलिसबरी पार्कसंदर्भात अभिप्राय

सॅलिसबरी पार्क येथील उद्यानाला भाजपाचे माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी त्यांच्या वडिलांचे नाव दिले आहे. या नावाला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. शिवाय खासदार गिरीश बापट यांनीही या प्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी आयुक्त विक्रम कुमार यांनी विधी विभागाचा अभिप्राय मागविला आहे. या अभिप्रायावर पुढील कार्यवाहीची दिशा ठरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

नाव देण्यावरून सातत्याने वाद

विकासकामांना नाव देण्यात नगरसेवकांमध्ये अनेकदा वादाचे प्रकार घडले आहेत. सभागृहाची मुदत संपताना नावे देण्यावरून नाव समितीच्या बैठकीत चांगलेच वाद झाले होते. तसेच, यापूर्वी दिलेले नाव बदलून तेथे दुसरे नाव देण्याचे प्रकार घडले आहेत.

SCROLL FOR NEXT