Latest

NAMCO Bank Election : नामको’साठी अवघे २९ टक्के मतदान, आज निकाल

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दि. नाशिक मर्चन्ट्स को. आॅप बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि.२४) २९.५० टक्के मतदान झाले. एक लाख ८८ हजार ६३८ मतदारांपैकी केवळ ५५ हजार ७२५ सभासदांनीच मतदानाचा हक्क बजावला. प्रतिस्पर्धी सहकार पॅनलने माघार घेतल्याने प्रगती पॅनलविरुद्ध सात अपक्ष अशी स्थिती असल्याने, मतदारांनी मतदान प्रक्रियेत फारसा रस दाखविला नसल्याचे दिसून आले. ३२४ केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली.

जिल्ह्यासह परराज्यात कार्यक्षेत्र असलेल्या नामको बँकेच्या संचालकपदाच्या २०२३-२४ ते २०२८-२९ या कालावधीसाठी मतदान घेण्यात आले. सर्वसाधारण गटातील १८, तर अनुसूचित जाती-जमाती गटात एका जागेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. सर्वसाधारण गटातून २४, तर अनुसूचित जाती-जमातीमधून दोन उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, या सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद झाले असून, सोमवारी (दि.२५) सकाळी आठपासून मतमोजणी होणार आहे.

मतदानासाठी ९९ ठिकाणी एकूण ३२४ मतदान केंद्रांची रचना करण्यात आली होती. नाशिक शहरात १५५ मतदान केंद्रांवर एकूण ९० हजार ९१६ मतदार होते. तर नाशिक जिल्ह्यात १४४ मतदान केंद्रांवर ८२ हजार ८९३ मतदार होते. त्यापैकी नाशिक शहरात १९ हजार १२९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर नाशिक शहराबाहेरील ३६ हजार ५९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शहर व जिल्ह्यात मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेच्या वातावरणात पार पडली.

सायंकाळी ६ नंतर पाथर्डी फाटा येथील श्री छत्रपती संभाजी महाराज स्टेडियम येथे मतदान पेट्या जमा होण्यास सुरुवात झाली. बँकेचे जाळे राज्यासह परराज्यात असल्याने रात्री उशिरापर्यंत मतपेट्या येत होत्या. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा २६५ मतपेट्या स्ट्राँग रूममध्ये पोहाेचल्या होत्या. दरम्यान, निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सहकार खात्याच्या जवळपास अडीच हजार कर्मचाऱ्यांनी आणि पोलिस विभागाच्या पाचशे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

मत टक्का घसरला

मागील पंचवार्षिक निवडणुकीत तीन पॅनलमध्ये लढत झाली होती. त्यावेळी एक लाख ७६ हजार २६२ मतदारांपैकी ६० हजार २८ मतदारांनी (३४.५० टक्के) मतदानाचा हक्क बजावला होता. यंदा प्रगती पॅनलविरुद्ध सात अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याने, मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही. दुपारी दीडपर्यंत अवघे ८.३६ टक्केच मतदान झाले होते. शेवटच्या काही तासांत मतदारांनी काहीसा उत्साह दाखविल्याने मताची टक्केवारी काहीशी वाढली.

'प्रगती'मध्ये उत्साह

प्रगती पॅनलच्या सर्व उमेदवारांनी सकाळच्या सत्रातच मतदान केंद्रावर हजेरी लावत मतदानाचा हक्क बजावला. त्याचबरोबर अपक्ष उमेदवारांनीदेखील मतदान करीत अधिकाधिक सभासदांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन केले. दरम्यान, मतदान शांततेत पार पडले असून, मतदानासंदर्भात कोणत्याही तक्रारी प्राप्त झाल्या नाहीत.

हेही वाचा –

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT