नागपूर : पुढारी वृत्तसेवा : दोन चिमुकल्या मुलींची आई असलेल्या एका मेंदूमृत विवाहितेच्या अवयवदानातून तीन व्यक्तींना जीवनदान मिळाले. तर त्यांच्या नेत्रदानामुळे दोन दृष्टीहिनांच्या जीवनात प्रकाश पडला. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) येथे प्रथमच मृत व्यक्तीच्या अवयव प्रत्यारोपन मोहिमेतून रुग्णाला अवयव प्रत्यारोपण झाले.
उत्तर नागपुरातील नारा वस्ती प्रभाग क्र. १ येथील रहिवासी सीमा सुरेंद्र वाघमारे (वय ४८) असे या अवयवदान करणाऱ्या मेंदूपेशी मृत झालेल्या विवाहितेचे नाव आहे. सीमा यांना तनया (१२) आणि जान्हवी (१०) अशा दोन मुली आहेत. ३ मेच्या मध्यरात्री सीमा वाघमारे यांना अचानक डोकेदुखीचा त्रास झाल्याने त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले. तिथे वैद्यकीय चाचणीमध्ये त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांना दुसऱ्या दिवशी तातडीने सीम्स हॉस्पीटल येथे दाखल करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर त्या डॉक्टरांकडून होत असलेल्या औषधोपचारालाही प्रतिसाद देत होत्या. परंतु ६ मेरोजी त्यांना पुन्हा दुसरा झटका आला.
डॉक्टरांनी सीमा यांचे प्राण वाचविण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र, त्या उपचाराला प्रतिसाद देत नव्हत्या. अखेर ९ मेरोजी त्यांची त्यांना मेंदूमृत घोषित करण्यात आले. कुटुंबियांनी अवयव प्रत्यारोपणासाठी संमती दिल्यावर सीमाला अवयव प्रत्यारोपणाच्या दृष्टीने एम्स नागपूर येथे हलवण्यात आले. ११ मेरोजी प्रतीक्षा यादीतील नागपुरातील ५१ वर्षीय पुरुष रुग्णाला मुत्रपिंड प्रत्यारोपीत केले गेले. एक मुत्रपिंड केअर रुग्णालय तर यकृत किंग्जवे रुग्णालयातील रुग्णात प्रत्यारोपीत केले गेले. त्यांचे नेत्र हे महात्मे आय बँक येथे दान करण्यात आले. या प्रत्यारोपणासाठी एम्सचे संचालक डॉ. हनुमंता राव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनिष श्रीगिरीवार यांच्यासह एम्सच्या चमूने अथक प्रयत्न केले. सुप्रसिद्ध मुत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. संजय कोलते आणि अवयव प्रत्यारोपण समितीची भूमिका यात महत्वाची ठरली.
हेही वाचा