Latest

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाबाबत गूढ कायम

backup backup

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तिन्ही ठिकाणी प्रस्थापित की नवे नेतृत्व असणार यावर अटकळबाजी सुरू आहे. मात्र, आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन भाजप नेतृत्व मुख्यमंत्री निवडताना कमालीची सावधगिरी बाळकत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री निवडीसाठी येत्या दोन-तीन दिवसांत राज्यांमध्ये भाजपतर्फे निरीक्षक पाठवले जातील. त्यांच्या अहवालाच्या आधारे मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल.

तिन्ही राज्यांमधील मुख्यमंत्री निवडीबाबत पत्रकारांशी अनौपचारिक वार्तालापात बोलताना भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी लवकरच राज्यांमधील मुख्यमंत्र्यांच्या निवडीचे काम पूर्ण केले जाईल असे सांगितले. मात्र त्यासाठी कोणत्याही कालमर्यादेचा त्यांनी उल्लेख केला नाही. निरीक्षक पाठवण्याबाबत त्यांनी एक-दोन दिवसांत माहिती मिळेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. दुसरीकडे, भाजप सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री पदाच्या निर्णयापूर्वी राज्यांमध्ये नवनिर्वाचित आमदारांची बैठक होईल आणि त्यातच विधिमंडळ पक्षनेतेपदाची निवड जाहीर होईल.

छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री निवडताना भाजप नेतृत्वाला फारशी अडचण होणार नसली तरी राजस्थान आणि मध्यप्रदेशात, लोकसभा निवडणुकीतील यशासाठी भरवशाचा अनुभवी चेहरा हवा यावर भाजप नेतृत्वाने लक्ष केंद्रीत केल्याचे समजते. त्यामुळे मध्यप्रदेशात भाजपच्या विजयात महत्त्वाचा वाटा असलेले विद्यमान मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या फेरनिवडीची जोरदार चर्चा सुरू असताना केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, प्रल्हाद पटेल, सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय ही नावे देखील या पदाच्या शर्यतीत आली आहेत. त्यापार्श्वभूमीवर राज्यात आमदारकीची निवडणूक लढलेले केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी संसद अधिवेशनादरम्यान आज पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच गृहमंत्री यांची भेट घेतल्याने नव्याने कयास सुरू झाले आहेत. उद्या (५ नोव्हेंबर) प्रल्हाद पटेल यांनी पत्रकार परिषद बोलावली असल्याने त्यांच्या केंद्रीय मंत्री पदाच्या राजिनाम्याबद्दलही अंदाज लढविले जात आहेत. मात्र भाजप नेतृत्वाशी झालेली भेट ही निवडणूक निकालानंतरची शिष्टाचार भेट होती. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय नेतृत्वच ठरवेल, अशी प्रतिक्रिया प्रल्हाद पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. तर, भाजप सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनीही पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शिष्टाचार भेट घेतली. तसेच मुख्यमंत्रीपदाचा निर्णय पक्षनेतृत्व करेल अशी सावध भूमिकाही स्पष्ट केली. दरम्यान, संसद भवनात भाजपच्या आणि विरोधी पक्षांच्या खासदारांनीही या नेत्यांचे विजयासाठी अभिनंदन केले.

मध्यप्रदेशप्रमाणेच राजस्थानात मुख्यमंत्रीपदासाठी वसुंधरा राजे यांच्या नावासोबतच अल्वरचे खासदार बाबा बालकनाथ, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, जलसंपदा मंत्री गजेंद्रसिंह शेखावत ही नावे देखील चर्चेत आहेत. मुख्यमंत्री पदासाठी वसुंधरा राजे प्रबळ दावेदार असल्या तरी त्यांच्या कार्यपद्धतीवर भाजप नेतृत्व समाधानी नसल्याचेही सातत्याने सांगितले जाते. असे असताना लोकसभा निवडणुकीमुळे वसुंधरा राजे की अन्य कोणी या निवडीचे आव्हान केंद्रीय नेतृत्वापुढे आहे. लोकसभा निवडणुकांसाठी कोणताही धोका पत्करण्याची भाजपची तयारी नसल्याने दुसरा चेहरा निवडायचा झाला तरी आधी वसुंधरा राजेंकडून होकार मिळवावा लागणार असल्याचीही जोरदार चर्चा आहे.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT