Latest

खटाव तालुक्यातील येलमरवाडीत अनैतिक संबंधाला अडथळा ठरल्याने वृद्धेचा खून

Arun Patil

कातरखटाव ; पुढारी वृत्तसेवा : येलमरवाडी (ता. खटाव) येथे अनैतिक संबंधाला अडथळा ठरल्याने हिराबाई दगडू जगताप (वय 70) या वृद्धेचा खून करण्यात आला आहे. दि. 12 रोजी रात्री 8 वाजता ही घटना घडली. याप्रकरणी वडूज पोलिसांनी संगीता गणपत देशमुख, तुळशीराम सखाराम बागल (दोघे रा. येलमरवाडी) यांना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी गौतम कृष्णा नलवडे (रा. येलमरवाडी, ता. खटाव) वडूज पोलिस ठाण्यात दिली आहे. रविवार दि.12 रोजी रात्री 9.30 च्या सुमारास हिराबाई या गावातील बाळकृष्ण पोळ यांच्याघरासमोर पडलेल्या काही लोकांना दिसल्या. बराच वेळ झाला तरी त्या जागच्या हालत नसल्याने स्थानिकांनी जवळ जाऊन पाहणी केली असता डोक्यातून रक्त वाहत असलेल्या हिराबाई या मृतावस्थेत असल्याचे लक्षात आले.

त्यानंतर स्थानिकांनी घटनेची माहिती हिराबाई यांचे भाचे गौतम नलवडे यांना कळवली. नलवडे यांनी घटनास्थळी येत पडलेला मृतदेह हा त्यांच्या मावशीचा असल्याचे ओळखल्यानंतर वडूज पोलिसांना कळवले.

घटनेचे गांभीर्य ओळखत सपोनि मालोजीराव देशमुख यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्णालय वडूज येथे पाठवून घटनेबाबत गावात चौकशीला सुरुवात केली. मृत हिराबाई या गावात भिक्षा मागून खात असल्याने त्यांचे कोणासोबत वैर असण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे संशयितांचा शोध घेण्याबरोबरच गुन्ह्याची उकल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. दरम्यान, पोलिसांचे एक पथक तक्रार दाखल करून घेत होते तर दुसरे पथक येलमरवाडीत तळ ठोकून होते. यावेळी संशयित बागल हा पोलिसांच्या तपासाबाबत संशयास्पद माहिती घेत होता.

ही बाब सपोनि देशमुख यांच्या लक्षात आली. या घटनेचा भांडाफोड झाला. संशयित म्हणून बागल याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी केली. तो व तिची प्रेयसी संगिता यांच्यात अनैतिक संबंध सुरू असताना हिराबाई यांनी भिक्षा मागण्यासाठी वारंवार दरवाजा ठोठावला. त्यामुळे रागाच्या भरात डोक्यात दांडक्याने मारहाण केल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी संगीता हिलाही अटक केली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर अधीक्षक धीरज पाटील, डीवायएसपी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मालोजीराव देशमुख, महिला पोलिस उपनिरीक्षक शीतल पालेकर यांच्यासह पथकाने केली.

देवकर कुछ तो गडबड है

येलमरवाडीसारख्या शांत गावात खुनाची घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिस गावात माहिती घेत असतानाच संशयित बागल हा पोलिस तपासाची माहिती अंधारात बसून ऐकत होता. नेमकी हीच गोष्ट सपोनि देशमुख यांच्या नजरेत बसली अन् पोलिस अंमलदार दीपक देवकर यांना उद्देशून देवकर कुछ तो गडबड है, असे म्हणून बागल याला ताब्यात घेतले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT