पुणेः पुढारी वृत्तसेवा : चौघा जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सुप्परइंदिरानगर बिबवेवाडी (पुणे) परिसरात घडली. धुलीवंदनाच्या दिवशी रंग लावण्याच्या तत्कालिन वादातून हा खून झाला असल्याचे समजते. तरुणावर वार केल्यानंतर टोळक्याने परिसरात हातात कोयते फिरवून आरडा-ओरडा करत दहशत माजवली.
योगेश रामचंद्र पवार (वय 21, रा. सुवर्णयुग मित्र मंडळाजवळ, सुप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा मित्र वैभव सोमनाथ घाटूळ (वय 22, रा. टिळेकर नगर, कात्रज-कोंढवा रस्ता) याने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विश्वास शिंदे, नागेश फुलारे, आणि ओंकार खाटपे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, संशयित आराेपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव हा योगेशचा मित्र आहे. धुलिवंदन असल्यामुळे योगेश व त्याच्या मित्रांनी बिर्याणी पार्टी केली. जेवण झाल्यानंतर सर्वजण सुप्पर इंदिरानगरच्या शंकराच्या मंदिराजवळ गप्पा मारत बसले होते. योगेश हा त्याच्या दुचाकीवरून दारू आणण्यासाठी गेला. काही वेळातच तो परत आला. त्याच्या चेहर्याला रंग लावलेल्या दिसला. मित्रांनी विचारणा केली असता विश्वास शिंदे व त्याच्या मित्रांनी रंग लावल्याचे त्याने सांगितले. शिंदे व याेगेशच्या गाडीचा दोन महिन्यांपूर्वी अपघात झाला होता. त्यावरून त्यांच्यात वादावादी झाली होती. त्या रागातून आज आडवून रंग लावल्याचे त्याने सांगितले.
योगेश व त्याचा मित्र गणराज हे दुचाकीवरून सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सुप्पर इंदिरानगर येथे घरी निघाले. त्यावेळी आरोपी हे रस्त्यात उभे होते. त्यांच्यापैकी एकाने पुन्हा योगेशच्या तोंडावर रंग फेकला. त्यामुळे त्याने दुचाकी थांबवून आरोपींना शिवीगाळ केली. त्यावेळी आरोपी कोयते घेऊन आले. त्यांनी योगेश याच्या हातावर, पोटावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. योगेशसोबत असलेला मित्र घाबरून पळून गेला.
योगेशवर वार केल्यानंतर आरोपींनी हवेत कोयते फिरवत आरडा-ओरडा करून परिसरात दहशत निर्माण केली. त्यामुळे नागरिकांनी तत्काळ घरे बंद करून घेतली. काही वेळात योगेशचे वडील व इतर मित्र आले. त्यांनी त्याला तत्काळ ससून रुग्णालयात दाखल केले.
पण, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त नम्रता पाटील व बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा माग करून चौघांना ताब्यात घेतले. तपास पोलिस उपनिरीक्षक संजय अदलिंग करीत आहेत.
हेही वाचलं का?