Latest

Mumbai Megablock : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! माटुंगा, पनवेल मार्गावर ‘मेगाब्लॉक’

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवारी (दि. ७ रोजी) अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-कुर्ला-सीएसएमटी आणि पनवेल-वाशी-पनवेल विभागादरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील. ब्लॉकदरम्यान हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे- वाशी/नेरूळ स्थानकांतून सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवासाची परवानगी असेल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.

कोणत्या मार्गावर असेल मेगा ब्लॉक ?

माटुंगा : मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर
वेळ : सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ या वेळेत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा माटुंगा येथे धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तसेच या गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार थांबतील. ठाण्याच्या पलीकडील जलद गाड्या मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार थांबतील. पुढे माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

पनवेल : वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर (बेलापूर/नेरुळ-खारकोपर लाईन वगळून)
सकाळी : ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत

पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत ठाणे येथे जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई – वाशी सेक्शनमध्ये विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ- खारकोपर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.

हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाकडून दिलगीरी व्यक्त केली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT