Latest

मुंबई : मानखुर्दचे नाव हटवून छत्रपती शिवाजी नगर करणार; पंतप्रधानांच्या रोड शो पूर्वी नव्या वादाला सुरुवात

Sonali Jadhav

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकारण तापू लागले आहे. त्यातच आता मानखुर्द हे नाव हटविणार, मानखुर्द शिवाजीनगर विभागाचे नाव केवळ छत्रपती शिवाजीनगर असे करणार असल्याचे सांगत भाजप उमेदवाराने नव्या वादाला तोंड फोडले आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींचा येथील रोड शो पूर्वी अवघ्या चार दिवसांवर आला असताना नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील विरुद्ध भाजपचे मिहिर कोटेचा यांच्या थेट लढत सुरू आहे. या लोकसभा मतदारसंघातील मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा क्षेत्राचे नाव आता या निवडणुकीच्या प्रचारातील वादाचा मुद्दा बनला आहे. शिवाय स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी या लोकसभा मतदारसंघात रोड शो करणार असल्याने मतदारसंघातील वातावरण तापले आहे. संजय दिना पाटील यांनी मोदींच्या रोड शो वर तोंडसुख घेतल्यानंतर भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांनी पलटवार केला आहे.

नरेंद्र मोदी येणार या नुसत्या विचारानेच पाटील हे वेड लागल्यासारखे बडबडत आहेत. ज्या दिवशी मी निवडून येईल तेव्हा मानखुर्द शिवाजीनगरचे नाव फक्त छत्रपती शिवाजी नगर करणार, छत्रपतींच्या आशिर्वादाने इथले सगळे काळे धंदे, ड्रग्स,  गुटखा आणि मटका सगळे बंद करणार असा दावा कोटेचा यांनी केला आहे. पंतप्रधान मोदींच्या रोडशो पूर्वीच मानखुर्द शिवाजी नगर मधील मानखुर्द शब्द हटविण्याच्या घोषणेने नवाच वाद सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांच्या नामांतराच्या मागण्या सातत्याने होत असतात. त्यातच आता मानखुर्दची भर पडली आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT