Latest

Raj Babbar : अभिनेते राज बब्बर यांना दोन वर्षांची शिक्षा; निवडणूक अधिकाऱ्यास केली होती मारहाण

अमृता चौगुले

लखनौ; पुढारी ऑनलाईन : अभिनेता तसेच उत्तर प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष राज बब्बर (Raj Babbar) यांना एमपीएमएलए या विशेष कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय न्यायालयाने राज बब्बर यांच्यावर ८५०० रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. शासकीय कामात अडथळा निर्माण करणे तसेच मारहाण प्रकरणी राज बब्बर यांना दोषी ठरविण्यात आले आहे. या प्रकरणी गुरुवारी (दि.७ जुलै) सुनावणी पार पडली यावेळी राज बब्बर स्वत: न्यायालयात हजर होते. विशेष म्हणजे २६ वर्षांपुर्वीच्या प्रकरणामध्ये राज बब्बर यांना दोषी ठरवत शिक्षा सुनावण्यात आली.

अभिनेते राज बब्बर (Raj Babbar) यांच्यावर १९९६ च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान निवडणूक अधिकाऱ्यास मारहाण करण्याचा आरोप होता. निवडणूक अधिकाऱ्यांनी २ मे १९९६ रोजी वजीरगंज पोलिस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली होती. त्यावेळी राज बब्बर हे समाजवादी पक्षाचे उदेवार होते. यावेळी त्यांनी बोगस मतदानाचा आरोप लावत बुथ क्रमांक १९२ च्या निवडणूक अधिकाऱ्याला मारहाण केली होती.

जामीन मिळण्याची शक्यता (Raj Babbar)

राज बब्बर यांना झालेली शिक्षा तीन वर्षांहून कमी कालावधींची आहे. त्यामुळे त्यांना कारागृहात पाठविण्यात येणार नाही. म्हणून त्यांना जामीन मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या शिक्षेच्या सुनावणीनंतर राज बब्बर यांनी आपण या निर्णयाला आव्हान देणार असल्याचे सांगितले. अलिकडेच चर्चा रंगली होती की, राज बब्बर हे काँग्रेस सोडून पुन्हा समाजवादी पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. उत्तर प्रदेशमधील टुंडला येथून येणारे अभिनेता राज बब्बर यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात जनता दलातून केली होती.

राज बब्बर यांनी केला आहे डिंपल यादव यांचा पराभव (Raj Babbar)

पाच वर्षांपर्यंत जनता दलात राहिल्यानंतर अभिनेते राज बब्बर यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. यानंतर त्यांनी २००६ साली सपाला रामराम ठोकला आणि २००८ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याशिवाय त्यांनी २००९ मध्ये त्यांनी फिरोजाबाद मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली व अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांचा पराभव केला होता.

काय आहे एमपीएमएलए विशेष न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने विशेष न्यायालायाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये आमदार आणि खासदार यांच्यावर दाखल असणाऱ्या फौजदारी गुन्ह्यांचा ताबडतोब निकाल लावण्यासाठी हे विशेष न्यायालये स्थापन करण्यात आली आहेत. अनेक वर्षांपासून आमदार आणि खासदारांवरील फौजदारे गुन्ह्यांचे खटले प्रलंबित आहेत. यांचा निकाल लावण्यासाठी या विशेष न्यायालयांची स्थापना करण्यात आली आहे. याच अंतर्गत राज बब्बर यांच्यावर १९९६ मध्ये दाखल असणाऱ्या गुन्ह्यात त्यांना आता शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT