नगर : पुढारी वृत्तसेवा : 'आरआरएसएस म्हटले की मी चार पावले दूर राहिलोे', हा विचार असलेल्या यशवंतराव चव्हाण यांचा फोटो तुम्ही वापरता, त्या वेळी तुम्हाला भाजपशी मैत्री करता येणार नाही, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाला लगावला.
हल्लेखोरांच्या मारहाणीत जखमी झालेले ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांना भेटण्यासाठी सुप्रिया सुळे त्यांच्या निवासस्थानी आल्या, तेव्हा तेथेच त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, की यशवंतराव चव्हाण हयात असताना जे कधीही काँग्रेसमध्ये नव्हते त्यांनी नाशिकच्या कार्यक्रमात त्यांंचे पोस्टर लावले. मात्र खरोखरच जर कोणी चव्हाण यांचे विचार पुढे नेत असतील, तर मी त्यांचे स्वागत करते. मात्र त्यांचे विचार हे त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेले असून, जर त्या विचारांचा प्रचार करायचा असेल, तर भाजपशी दोस्ती करता येणार नाही, असेही सुळे यांनी ठणकावून सांगितले. यशवंतराव चव्हाणांचे विचार, त्यांनी दिलेली शिकवण ही शरद पवार यांनी पुढच्या पिढीला दिली. शिक्षण, महिला, सहकार, भटके-विमुक्त इत्यादी समाजहिताची धोरणे राबवून त्यांचे मानसपुत्र म्हणून शरद पवार यांनीच चव्हाणांचा खरा वारसा चालविला, असे उद्गारही सुळे यांनी काढले.
आयोगाचा पेपर फुटला आहे का
निवडणूक आयोगातील लढ्यावर भाष्य करताना खा. सुळे म्हणाल्या, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत कोणालाही विचारा, की राष्ट्रवादीची स्थापना कोणी केली, पक्ष कोणाचा आहे, याचे उत्तर मिळेल. मात्र कोर्टावर आणि निवडणूक आयोगावर माझा विश्वास आहे. आज त्या गटातील काही लोक चिन्ह आणि पक्ष आम्हालाच मिळणार, याच तारखेला मिळणार, असे सांगत आहेत. त्यामुळे त्यांना हे कसे माहीत, आयोगाचा पेपर फुटला आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. यात काहीतरी गोलमाल आहे का, दिल्लीची अदृश्य शक्ती काहीतरी गडबड करील का, अशी शंका वाटते, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
भाजपची 'टोलमुक्त देश' ही घोषणा, निंबाळकरांनी म्हाडामधून लढविण्यासाठी दिलेले आव्हान, यावरही त्यांनी चर्चा केली.
आरक्षणाच्या विधेयकाला सहकार्य करू. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम या चारही समाजाला आरक्षण द्यावे. चर्चेला बसायची आमची तयार आहे. सरकारने विधेयक आणले तर आम्ही सहकार्य करू. मात्र भाजपची आरक्षणाबाबत वेगवेगळी धोरणे असल्याने हे जुमलेबाज सरकार असल्याची टीकाही त्यांनी केली.
तातडीने दुष्काळ जाहीर करा
महाराष्ट्रात तातडीने दुष्काळ जाहीर केलाच पाहिजे. खोके सरकार काम सोडून सगळे उद्योग करतात. महाराष्ट्र सरकारने झोपेचे सोंग घेतले असून आज माध्यमांद्वारे त्यांना मी महाराष्ट्रात तातडीने दुष्काळ जाहीर करावा, छावण्यांचे नियोजन करावे, पिण्याच्या पाण्याचे नियोजन करून कष्टकरी शेतकर्याला न्याय द्यावा, असे भावनिक आवाहनदेखील खासदार सुळे यांनी केले.
हे ही वाचा :