शिवाजी देशमुख, सेनगाव: तालुक्यातील हाताळा ग्रामपंचायत निवडणूक सासू-सूनेच्या उमेदवारीने चांगलीच चर्चेत आली होती. या निवडणुकीकडे अवघ्या हिंगोली जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मंगळवारी (दि.२०) झालेल्या शोभाबाई धामणकर यांनी सरपंचपदासाठी 571 मते घेऊन विजय मिळविला. त्यांनी सून संगीता धामणकर यांचा पराभव केला.
सेनगाव तालुक्यातील हाताळा ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी 5 उमेदवार निवडणुक रिंगणात होते. यामध्ये सासू शोभाबाई धामणकर यांच्या विरुध्द त्यांची सून संगिता धामणकर यांच्या प्रमुख लढत होती. त्यामुळे सरपंचपदासाठी कोण बाजी मारणार?, याची उत्सुकता अवघ्या परिसरात लागली होती.
विशेष म्हणजे मंगळवारी (दि.२०) पराभूत झालेल्या सून संगिता धामणकर यांनी यापूर्वी १० वर्षे सरपंचपद भुषवले आहे. यावेळीही त्यांनी सरपंचपदासाठी आपली उमेदवारी दाखल केली होती. त्यांच्याविरोधातच नवख्या असलेल्या त्यांच्या सासू शोभाबाई धामणकर निवडणुक रिंगणात उतरल्या होत्या. याशिवाय कोमल काळे, शारदा काळे यांनी देखील सरपंचपदासाठी अर्ज दाखल केले होते.
दरम्यान, गावात सरपंच पदासोबतच सदस्य पदाचा प्रचार शिगेला पोहोचला होता. यामध्ये राजकारणात १० वर्षे सरपंच असलेल्या संगीता बाजी मारणार की, राजकारणात नवख्या असलेल्या त्यांच्या सासू शोभाबाई बाजी मारणार? याकडे स्थानिक नागरिकांसोबतच जिल्ह्यातील नागरीकांचे लक्ष लागले होते.
आज सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयात मतमोजणी सुरु झाली. यामध्ये सरपंचपदासाठी उभा असलेल्या सासू शोभाबाई धामणकर यांना 571 मते मिळवत त्या विजयी झाल्या. त्यांच्या सूनबाई संगीता धामणकर यांना 250 मते मिळाली. कोमल काळे यांना 475 तर शारदा काळे यांना 17 मते मिळाल्याचे गावकर्यांनी सांगितले. या निवडणुकीत सूनेपेक्षा सासू वरचढ ठरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.