Latest

Moonlighting प्रकारावरून विप्रो कंपनी नरमली, कंपनीचे सीईओ म्हणाले…

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'मूनलाइटिंग' (Moonlighting) (एका कंपनीत पूर्णवेळ कर्मचारी असताना दुसरे काम करण्याचे स्वातंत्र्य) विरोधात कठोर भूमिका घेणाऱ्या माहिती-तंत्रज्ञान (IT Companies) कंपन्यांची संख्या वाढत आहे. तथापि, मूनलाइटिंग हे चूकीचे आहे, असे टाटा समूहाच्या (TATA Group) टीसीएस (TCS) कंपनीने म्हटले. पण त्यांनी कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकण्यास नकार दिला. टीसीएसच्या या भूमिकेनंतर विप्रो लिमिटेडने (WIPRO Ltd.) देखील आपली भूमिका नरम केली आहे.

'मूनलाइटिंग' (Moonlighting) प्रकरणात दोषी आढळलेल्या 300 कर्मचाऱ्यांना विप्रोने नुकतेच कामावरून काढून टाकले होते. त्या प्रकरणानंतर काही दिवसातच विप्रोने आपल्या कडक भूमिकेत बदल केला आहे. कंपनीने म्हटले आहे की, 'नोकरी करत असताना एखादे छोटे काम करणे ठीक आहे. पण प्रतिस्पर्धी कंपनीसाठी काम करणे हा 'नैतिक प्रश्न' आहे.'

गेल्या महिन्यातच विप्रोला प्रतिस्पर्धी संस्थेसोबत काम करणारे अर्थातच Moonlighting करणारे 300 कर्मचारी सापडले होते. त्यानंतर त्या कर्मचा-यांवर कंपनीने कारवाई करत कामावरून काढून टाकले होते. विप्रोचे सीईओ डेलापोर्टे यांनी चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, कंपनीत काम करणारे कर्मचारी नियमानुसार इतर कोणतेही काम करू शकत नाहीत. कंपनीत काम करणा-या कर्मचार्‍यांनी केवळ विप्रोसाठीच नाही तर स्वतःसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठीही काम करणे आणि वेळ देणे अपेक्षित आहे,' असे त्यांनी सांगितले.

डेलापोर्टे पुढे म्हणाले, 'विप्रोसोबत काम करत असताना, इतर काही छोट्या असाइनमेंटवर काम करणे ठीक आहे. पण जर तुम्ही आमच्या प्रतिस्पर्धी कंपनीसाठी काम करत असाल तर ती चूकीची बाब आहे. म्हणून मूनलाईट हा वैधतेचा प्रश्न नाही, तर नैतिकतेचा प्रश्न आहे', असेही त्यांनी स्पष्ट केले. विप्रोच्या प्रेमजी यांनी मूनलाइटिंगवर जोरदार टीका केली होती आणि त्याला 'फसवणूक' म्हणून संबोधले होते. विप्रोचे अध्यक्ष ऋषद प्रेमजी यांनी गेल्या महिन्यातच, 'विप्रोच्या वेतनावर असताना प्रतिस्पर्ध्यांसोबत थेट काम करणार्‍या कोणत्याही कर्मचार्‍यांसाठी कंपनीकडे जागा नाही', असा सज्जड दम त्यांनी दिला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT