Latest

शंभर वर्षांत मान्सून-अल निनोचे संबंध बदलले ; मध्य भारतात दहा वर्षांत कमजोर

अमृता चौगुले

पुणे : शंभर वर्षांत मान्सून आणि अल निनोचे संबंध बदलले असून भारताचा विचार केला तर प्रादेशिक पातळीवर त्याचे संबंध बदलत चालले आहेत. मध्य भारतात गत दहा वर्षांत संबंध कमजोर झाले. दक्षिण भारताशी त्याचे संबंध स्थिर आहेत. मात्र, उत्तर भारताशी त्याचे संबंध आश्चर्यकारपणे घनिष्ट झाल्याने त्या भागात धो-धो पाऊस पडतोय, असा निष्कर्ष पुणे आयआयटीएमचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल यांच्यासह त्यांच्या सहकारी शास्त्रांनी काढले आहेत.

पुणे शहरात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (आयआयटीएम) ही सुमारे 65 वर्षे जुनी संस्था आहे. या ठिकाणी जागतिक दर्जाचे हवामान शास्त्रज्ञ कार्यरत असून पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे हे महत्त्वाचे संशोधन केंद्र आहे. येथे डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल हे वरिष्ट शास्त्रज्ञ जगासह भारताच्या हवामानावर संशोधन करीत आहेत. नुकताच त्यांनी एक शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे. यात त्यांनी भारतीय मान्सून आणि अल निनोचा संबंध प्रादेशिक पातळीवर कसा बदलला आहे यावर संशोधन केले. 1871 ते 2022 या 152 वर्षांतील भारतीय उपखंडात मान्सून व अल निनोचे संबंध कसे बदलत चाललेत याची कारणे मांडली आहेत.

प्रादेशिक पातळीवर मान्सून बदलतोय…
मान्सूनचा प्रभाव पूर्वी देशपातळीवर एकसारखा जाणवत असे. मात्र, गेल्या शंभर वर्षांत भारतात प्रादेशिक पातळीवर एल निनोशी त्यांचे संबंध कुठे घनिष्ट तर कुठे कमकुवत होत गेले आहेत. दर वर्षागणिक हे बदल भारतभर होत चालले आहेत. सायंटिफीक रिपोर्टस् या जागतिक दर्जाच्या संशोधन पत्रिकेत हा शोधनिबंध प्रसिद्ध होताच मान्सून प्रदेशवार का लहरी बनला आहे याचा अंदाज येतो.

प्रशांत महासागरातील तापमान फरक कारणीभूत…
प्रशांत महासागराच्या तापमानातील चढउतारामुळे मान्सूनचे मोठ्या प्रमाणावर परिणाम दिसतात. या महासागरातील दोलनांवर अल निनो आणि ला निना यांचे वर्चस्व आहे. ऊबदार आणि थंड प्रदेशा मध्ये-पूर्व पॅसिफिकमधील पाण्याचे टप्पे, ज्याला अल निनो सदर्न ऑसिलेशन म्हटले जाते. अल निनोमुळे प्रशांत महासागर ओलांडून वाहणारे व्यापार वारे कमजोर होतात. हे वारे भारतातील आर्द्रतेने भरलेल्या मान्सूनच्या वार्‍याशी जोडलेले असतात.यामुळे अल निनो सक्रिय झाल्याने अर्धा पावसाळा दुष्काळीच आहे. सरासरी पेक्षा 10 टक्क्यांनी पाऊस भारतात घटला आहे.

प्रादेशिक पातळीवर असा बदलतोय मान्सून…
अल निनो व मान्सूनचा प्रादेशिक पातळीवरचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की हे संबंध 1901 पासून अधिक बदलत आहेत. मान्सून सर्वत्र एकसारखा पडत नाही. 1901 ते 1940 मध्ये झपाट्याने बदल झाले. ते बदल 1941 ते 1980 पर्यंत स्थिर झाले. पुन्हा 1981 ते 2022 पर्यंत त्यांच्यात प्रदेशवार बदल होत आहेत.

आतापर्यंत अल निनोचा प्रभाव तसा मर्यादित आहे. मात्र, जसा पावसाळ्याचा उत्तरार्ध सुरू होत आहे. तसा त्याचा प्रभाव वाढू शकतो. वातावरणातही परस्पर संबंधाची भाषा असते. त्याला शास् त्रीय भाषेत टेलिकनेक्शन म्हणतात. ते कमकुवत होत चालले आहे. एकूणच मान्सून आणि अल निनोचा प्रभाव देशात एकसारखा राहिलेला नाही. तो विभागवार बदलतो आहे.
                            – डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल, वरिष्ठ शास्त्रज्ञ आयआयटीएम, पुणे

उष्णता आणि उदासिनता याचा संबंध..
देशात उष्णतेच्या लाटा वाढल्या आहेत. त्याचा व मान्सूनचा परस्पर संबंध आहे. प्रशांत महासागरासह हिंही महासागराच्या पृष्ठभागाच्या तापमानावर हे गणित बदलत आहे. महासागरातील पाण्याचे तापमान सतत वाढत आहे. त्यामुळे हिंदी महासागरातील मान्सूची ताकद दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे मान्सूनची उदासिनता वाढत आहे. म्हणजे तो दिवसेंदिवस एकाच जागी राहणे, पुढे न सरकणे असे प्रकार गेल्या दहा वर्षांत वाढले आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT