Latest

Covid mock drill | कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकार सज्ज, देशातील कोव्हिड रुग्णालयांमध्ये मॉक ड्रिल सुरू

दीपक दि. भांदिगरे

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : चीनसह काही देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याने भारतातही चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील कोव्हिड रुग्णालयांमध्ये आज मंगळवारी मॉक ड्रिल (Covid mock drill) सुरू करण्यात आले आहे. कोव्हिड व्यवस्थापन सज्जता सुनिश्चित करण्यासाठी हे मॉक ड्रिल करण्यात येत आहे.

देशात कोरोना वाढणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांनी दक्ष राहण्यास सांगितले आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली जात आहे. लोकांना योग्य उपचार मिळावेत याची खात्री करण्यासाठी आज देशभरातील कोव्हिड रुग्णालयांमध्ये मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे.

दरम्यान, कोव्हिड मॉक ड्रिलचा (Covid mock drill) आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आज दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलला भेट दिली. तसेच हैदराबाद येथील गांधी रुग्णालयातही मॉक ड्रिल करण्यात आले. देशभरातील अनेक रुग्णालयांमध्येही मॉक ड्रिल केले जात आहे.

देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांचा आलेख सौम्य प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांना द्रव्यरुपी वैद्यकीय ऑक्सिजनच्या (एलएमओ) नियमित तसेच कार्यात्मक पुरठ्यावर लक्ष ठेवण्याचे निर्देश नुकतेच दिले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून यासंदर्भात राज्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. देशातील कोरोना संसर्गाचा वेग कमी असून स्थिती नियंत्रणात आहे. पण भविष्यातील आव्हानांसाठी अगोदरपासूनच तयार राहावे लागेल. राज्य सरकारांनी त्यामुळे सर्व रुग्णालयांमध्ये नियमित तसेच कार्यात्मक 'एलएमओ'च्या पुरवठा सुनिश्चित करावा. ऑक्सिजन प्लँट्सला पुर्ण क्षमतेने कार्यान्वित करून नियमित तपासणीसाठी मॉक ड्रिल घेण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले होते.

ऑक्सिजन संबंधित मुद्दे आणि आव्हानांचे तात्काळ निराकरणासाठी राज्य स्तरावरील ऑक्सिजन नियंत्रण कक्षांना पुन्हा सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दैनंदिन ऑक्सिजन ची मागणी तसेच पुरवठ्यावर देखरेख ठेवावी.कोरोनामुळे उद्भवणाऱ्या संभावित आव्हानांचा सामना करण्यासाठी राज्यांनी व्हेंटिलेटरची व्यवस्था दुरूस्त करावी. ऑक्सिजन सिलेंडर तसेच त्यांनी रिफिलिंग करीता बॅकअँप स्टोरेजची व्यवस्था करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

दरम्यान, चीन, जपान, हाँगकाँग, बँकाँक तसेच दक्षिण कोरियातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. संबंधित प्रवाशांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना विलगिकरणात पाठवण्यात येईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी याआधी स्पष्ट केले होते.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT