Latest

पुणे: दगडफेक, वाहनांची तोडफोड करणार्‍या हेळेकर टोळीवर मोक्काची कारवाई

अमृता चौगुले

पुणे: दगडफेक केल्यानंतर एखाद्याचा जीव जाऊ शकतो हे माहिती असताना देखील दगडफेक करून चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पार्क केलेल्या गाड्यांची तोडफोड करणार्‍या हेळेकर टोळीवर संघटीत गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

टोळीप्रमुख यश दत्ता हेळेकर (21), शुभम शिवाजी खंडागळे (21), विनायक गणेश कापडे (20) आणि साईनाथ विठ्ठल पाटोळे (23, सर्व रा. एसआरए बिल्डींग, विमाननगर) यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली ही 83 वी कारवाई असून चालु वर्षातील ही 20 वी कारवाई आहे.

हेळेकर हा त्यांच्या साथीदारांसह चतुःश्रृंगी परिसरात दगडफेक करून आणि पार्क केलेल्या गाड्या फोडून तसेच आरडा ओरडा करत दहशतीचे वातावरण पसरवत होते. या टोळीवर यापूर्वीही खुनाचा प्रयत्न,जबरी चोरी, वाहन चोरी, खंडणी,मारहाण अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. प्रतिबंधक कारवाई करूनही त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केल्याने त्यांच्यावर मोक्काअंतर्ग कारवाईचा अहवाल चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजकुमार वाघचौरे, गुन्हे निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांनी परिमंडळ 4 चे पोलिस उपायुक्त रोहीदास पवार यांच्या मार्फत अपर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे सादर केला होता. चव्हाण यांनी टोळीवरील मोक्का कारवाईला मंजुरी दिली.

SCROLL FOR NEXT