Latest

Ram Shinde : लोकसभा निवडणुकीसाठी तयार : आमदार राम शिंदे

अमृता चौगुले

पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : मला पक्षाने 2019 मध्ये लोकसभेची उमेदवारी दिली नव्हती, मात्र मी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी तयार आहे, असे प्रतिपादन आमदार राम शिंदे यांनी श्रीक्षेत्र मोहटादेवी चरणी नतमस्तक होण्यासाठी आले असता केले. विशेष म्हणजे येथे येण्यापूर्वी त्यांच्या वाहनाचे सारथ्य आमदार नीलेश लंके यांनी केले. यावरून आमदार शिंदे यांच्या लोकसभेच्या रथाचे सारथ्य आमदार लंके यांनी स्वीकारले की काय, या राजकीय चर्चेला उधाण आले आहे. दोन्ही आमदारांना सोबत पाहताच उपस्थितांच्या भुवळ्या उंचावल्या.

मोहटा देवी गडावर आमदार शिंदे यांनी पत्नी आशा शिंदे यांच्यासमवेत देवीची पूजा व आरती केली. यावेळी आमदार लंके, भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, डॉ. मृत्यूंजय गर्जे, अर्जुन धायतडक आदी उपस्थित होते. देवस्थान समितीचे विश्वस्त शशिकांत दहिफळे, डॉ.श्रीधर देशमुख, अक्षय गोसावी, विठ्ठल कुटे, अनुराधा केदार, डॉ.ज्योती देशमुख, पोपट फुंदे, मुख्यकार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, भीमराव खाडे यांनी आमदार शिंदे व आमदार लंके यांचा सन्मान केला.

शिंदे म्हणाले, लोकसभेच्या उमेदवारीसाठी मी पक्षाकडे इच्छा व्यक्त केली असून, मी त्यावर ठाम आहे. 2014 ला पक्षाने तिकीट दिले नाही, 2019 ला मी घेतले नाही. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मी तयार आहे. यावर पक्ष आणि नेतृत्वाने निर्णय घ्यायचा आहे. आमदार शिंदे यांच्या वक्तव्याने भाजपचेच विद्यमान खासदार सुजय विखे यांना पक्षातच एक प्रतिस्पर्धी निर्माण झाला आहे.

आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेवर ते म्हणाले, ज्या घराण्याने पन्नास-साठ वर्षे या राज्याची सत्ता उपभोगली, त्यांनी पुन्हा युवा संघर्ष यात्रा काढावी लागते, हे त्यांचे दुर्दैव आहे. आमदार लंके म्हणाले, आमदार शिंदे पालकमंत्री असताना त्यांनी मला पक्षाचा विचार न करता मदत केली. त्यांच्याविषयी मनात आस्था असल्याने, मी त्यांची गाडी चालवायला बसलो. आता आम्ही महायुतीत एकत्र आहोत. कोणाला काय समजायचं, तो ज्याचा त्याचा विषय आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT