Latest

Mla Disqualification Case : शिंदे यांना गटनेतेपदावरून हटविण्याचा ठराव बनावट

अनुराधा कोरवी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवर गुरुवारी (दि. 23) सलग तिसर्‍या दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली. ठाकरे गटाच्या 'व्हिप'वर प्रश्नचिन्ह उभे केल्यानंतर शिंदे गटाच्या वकिलांनी गुरुवारी एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटविण्याचा ठरावच झाला नसल्याचा मुद्दा पुढे केला. त्यावरून, शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आणि ठाकरे गटाचे प्रतोद, आमदार सुनील प्रभू यांच्यात थेट आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. शिवाय, दोन्ही गटांच्या वकिलांमध्येही चांगलीच खडाजंगी झाली. त्यावर, तुमच्यामुळे सुनावणीला विलंब होत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाला कळवावे लागेल, असा इशारा राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटांच्या वकिलांना दिला. ( Mla Disqualification Case )

संबंधित बातम्या 

एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटविण्याचा ठरावच झाला नसल्याचा दावा जेठमलानी यांनी केला आहे. याविषयीच्या ठरावावर असलेल्या मंत्री उदय सामंत, संजय राठोड, दादा भुसे यांच्या सह्याच बनावट असल्याचे सांगत, या खोट्या सह्यांसाठी प्रतोद सुनील प्रभू यांना जबाबदार धरण्यात येईल, असा युक्तिवाद जेठमलानी यांनी केला. प्रभू यांनी हा आरोप फेटाळून लावतानाच, 'मला या कठड्यात आणून गुन्हेगार बनवले जात आहे,' असा पलटवार केला.

मी साक्षीदाराच्या पिंजर्‍यात आहे म्हणून तुम्ही मला गुन्हेगार ठरवत आहात; पण मी संविधानाची शपथ घेतली आहे. खोटे बोलणार नाही. शिवाय, शिंदे गटाच्या वकिलांकडून जो दावा करण्यात आला आहे तो खोटा आहे, असे प्रभू म्हणाले. यावेळी, अडचणींच्या प्रश्नांवर थेट उत्तर देण्याचे टाळत अध्यक्षांना दिलेल्या कागदपत्रांत बाबी सविस्तर नमूद केल्याचे उत्तर प्रभू यांनी कायम ठेवले. तसेच, ठरावच झाला नसल्याचा वकिलांचा दावा खोटा असल्याचेही त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.

सामंत, भुसे आणि राठोड यांच्या नावांपुढे बोगस सह्या आहेत. त्यामुळे या बनावटगिरीला तुम्हीच जबाबदार असल्याचा दावा वकील जेठमलानी यांनी केला. त्यावर, 21 जून रोजी झालेल्या बैठकीत रवींद्र वायकर यांनी ठराव मांडला. त्यानंतर या ठरावावर सर्वांनी सह्या केल्या. या बैठकीला उपस्थित असलेल्या आमदारांच्या सह्यांचे रजिस्टर मी याआधीच अध्यक्षांना सादर केले आहे. ते पुन्हा सादर करू किंवा तुम्ही पाहू शकता. त्यात राठोड, भुसे आणि सामंत यांच्या सह्या आहेत. ठरावावर सह्या केल्या त्यावेळी मी समोर होतो. मी संविधानाची शपथ घेऊन खोटे कसे काय बोलू शकतो? बोगस सह्या केल्याचा आरोप करून मला गुन्हेगार केले जात आहे, असे उत्तर सुनील प्रभू यांनी दिले. तसेच, 'वर्षा' बंगल्यावर दुपारी साडेबारा ते साडेचार या वेळेत बैठक झाल्याचेही त्यांनी सांगितले; तर सामंत, राठोड आणि भुसे यांनी ज्यावेळी ठरावावर सह्या केल्या त्यावेळी उद्धव ठाकरे समोर होते का? त्यांनी सह्या केल्याचे पाहिले का? अशा प्रश्नांची सरबत्ती जेठमलानी यांनी केला. यावर, उद्धव ठाकरे आणि माझ्यासमोर सह्या केल्या आहेत, असे प्रभू यांनी सांगितले.

प्रश्नांची सरबत्ती आणि प्रभूंची टोलेबाजी

जेठमलानी : 'व्हिप' आमदार निवासात पाठवला होता का? 20 जूनच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला किती आमदारांनी मतदान केले? नेमका किती आमदारांना 'व्हिप' प्रत्यक्षात दिले? जे आमदार तिथे नव्हते त्यांना कोणत्या मोबाईवरून 'व्हिप' पाठवला? 'व्हिप' पक्ष कार्यालयातील कर्मचारी मनोज चौगुले यांच्या मोबाईलवरून व्हॉटस् अ‍ॅप केला, तर तो तुम्ही बघितला का? असे विविध प्रश्न वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांना केले.

सुनील प्रभू यांनी या प्रश्नांवर तितकीच ठाम उत्तरे देताना, वकील जेठमलानी यांना भाषा वाकवावी, तशी वाकते हेही सुनावले. शिवाय, जे नऊ आमदार पक्ष कार्यालयात होते त्यांना तिथेच 'व्हिप' देण्यात आले; तर आमदार निवासातील आमदारांना कार्यालयीन कर्मचार्‍यांकडून 'व्हिप' पाठविण्यात आला व त्यांची सही घेण्यात आली. सही केलेली कागदपत्रे पक्ष कार्यालयात आहेत. जे आमदार तिथे नव्हते त्यांना मनोज चौगुले यांच्या मोबाईलवरून 'व्हिप' बजावण्यात आले. चौगुले यांनी 'व्हिप'चा मेसेज पाठविण्यात आल्याचे मला सांगितले आणि मी ते मानले. मी प्रतोद असल्यापासून आणि त्याच्याआधीपासून 'व्हिप'चा मेसेज पक्ष कार्यालयातील कर्मचार्‍याकडून दिला जातो, असे सुनील प्रभू यांनी स्पष्ट केले.

जेठमलानी : मनोज चौगुलेचा फोन किंवा त्यांचा फोन येथे सादर केलेला नाही. तसेच त्यांचा येथे साक्षीदार म्हणून उल्लेख नाही. त्यामुळे 'व्हिप'च्या बाबतीत कोणताही मेसेज कुठल्याही आमदाराला पाठवलेला नाही. असा 'व्हिप'च काढण्यात आलेला नाही. ( Mla Disqualification Case )

प्रभू : हे खोटे आहे.

जेठमलानी : तुम्ही 'व्हिप'बाबत इथे आणि सर्वोच्
प्रभू : मी संविधानाची शपथ घेतली आहे आणि मी बोलतोय ते सत्य आहे, खोटे नाही.

अधिवेशनाचा निर्णय कामकाज सल्लागार समितीत

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ठरल्याप्रमाणे 7 डिसेंबरपासून सुरू झाल्यास 11 डिसेंबरपासूनची सुनावणी नागपूरला घेण्यात येईल. अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरू होणार की 11, याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात येणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी स्पष्ट केले. दिलेल्या वेळेत सुनावणी पूर्ण करायची असल्याचे सांगत नार्वेकर यांनी पुढील कामकाजाच्या तारखा दोन्ही गटांसमोर वाचून दाखविल्या. ( Mla Disqualification Case )

सुनावणीच्या पुढील तारखा

28, 29 आणि 30 नोव्हेंबर
1, 2, 5, 6 आणि 7 डिसेंबर
11 तर 15 डिसेंबर : सलग सुनावणी
18 ते 22 डिसेंबर : सलग सुनावणी

राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटांच्या वकिलांना फटकारले

सुनावणीदरम्यान शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या वकिलांमध्ये चांगलीच जुंपली. त्यावर नार्वेकरांनी हस्तक्षेप करत दोन्ही बाजूंच्या वकिलांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी दोन्ही पक्षकार वकील युक्तिवाद करताना विनाकारण वाद घालत आहेत. त्यामुळे लवादाचा वेळ वाया जात आहे. मला ठरावीक वेळेत हे प्रकरण निकाली काढायचे आहे. तुमच्यामुळे सुनावणीला उशीर होईल, हे मला सर्वोच्च न्यायालयाला सांगावे लागेल, अशा शब्दांत राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटांच्या वकिलांना फटकारले. तसेच, तुमच्या वादाचा परिणाम वेळकाढूपणामध्ये होत आहे. हे मी रेकॉर्डमध्ये नोंद करतोय, असेही नार्वेकरांनी स्पष्ट केले.

दोन्ही गटांच्या वकिलांमध्ये जुंपली

सुनावणीत शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आणि ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्यात चांगलीच जुंपली. ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष नोंदविताना जेठमलानी यांनी उलटसुलट प्रश्न करत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही गटांच्या वकिलांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. जेठमलानी यांनी प्रभू यांच्या उत्तरांवर आक्षेप घेत केलेल्या आरोपांवर ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. यावर, मी माझे प्रश्न विचारत आहे. तुम्ही ज्युनिअर आहात, मध्ये बोलू नका, असे म्हणत जेठमलानी यांनी संताप व्यक्त केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT