Latest

Mizoram Election Result 2023 : मिझोरममध्येही सत्तांतर; झोरम पीपल्सची निर्णायक आघाडी

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभेची सेमी फायनल समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकीत मिझोरम या राज्यात देखील सत्तांतर निश्चित झाले आहे. झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) ने निर्णायक आघाडी घेतली आहे. रविवारी (दि.४) झालेल्या मतमोजणीत राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांत काँग्रेसची सत्ता बरखास्त होऊन तिथे भाजपने आपला झेंडा फडकावला. तर मध्य प्रदेशच्या बालेकिल्ल्यात पुन्हा कमळ फुलले. तेलंगणात सत्तांतर होऊन काँग्रेसने बहुमत मिळवले.

संबंधित बातम्या : 

मिझोरम विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. विधानसभेच्या एकूण ४० जागा असून बहुमताचा आकडा २१ आहे. येथील मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार होती, परंतु निवडणूक आयोगाने मिझोरममधील निकालाची तारीख बदलली होती. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार झोरम पीपल्स मूव्हमेंटने निर्णायक विजय मिळवल्याने सरकार स्थापन करणार आहे. झेडपीएम सध्या २७ जागांवर आघाडीवर आहे. सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट १० जागांपर्यंत मर्यादित आहे. भाजप २ जागांवर आघाडी घेऊन तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट झाली असून केवळ १ जागेवर घसरल्याचे चित्र आहे.

मिझोरममध्ये सत्तांतर

२०१८ च्या विधानसभा निवडणुकीत एमएनएफने २६ जागा जिंकल्या होत्या. झेडपीएमला ८ तर काँग्रेसला ५ जागा मिळाल्या होत्या. भाजपने एक जागा जिंकून आपले खाते उघडले होते. त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत एमएनएफने आणखी दोन जागा जिंकल्या होत्या. या निवडूकीत सत्ताधारी एमएनएफला धक्का देत लालदुहोमा यांच्या झेडपीएम या नव्या राजकीय पक्षाने निर्णायक आघाडी घेतली आहे. झोराम पीपल्स मूव्हमेंट हा पक्ष चार वर्षांपूर्वी उदयास आला. याचे नेतृत्व निवृत्त आयपीएस अधिकारी लालदुहोमा हे करतात. ते मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार आहेत.

मुख्यमंत्री झोरमथांगा यांचा पराभव

या निवडणुकीत झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंटला (MNF) आतापर्यंत ६ जागांवर विजय मिळाला असून ४ जागांवर आघाडी आहे. मुख्यमंत्री झोरमथांगा आयझॉल-पूर्व 1 मधून निवडणूक हरले आहेत. त्यांचा झेडपीएमच्या लालथनसांगा यांनी पराभव केला. दुसरीकडे भाजपने दोन जागा जिंकल्या आहेत. गेल्या वेळी पक्षाला एक जागा मिळाली होती.

लालदुहोमा घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

झोरम पीपल्स मूव्हमेंटने पूर्ण बहुमताकडे वाटचाल केल्याचे स्पष्ट होत असल्याने झेडपीएमचे प्रमुख आणि मुख्यमंत्री पदाचे उमेदवार लालदुहोमा मिझोरामचे पुढील मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील हे स्पष्ट आहे. २२ फेब्रुवारी १९४९ रोजी जन्मलेले लालदुहोमा राजकीय क्षेत्रात अनोळखी नाहीत. त्यांचा प्रवास आयपीएस अधिकारी म्हणून सुरू झाला. १९८४ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकून इतिहास घडवला. मात्र पक्षांतरविरोधी कायद्यांतर्गत अपात्रतेला सामोरे जाणारे ते पहिले खासदार बनले. लालदुहोमा यांनी मिझोरामच्या राजकारला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत ते ZNP आणि ZPM युतीचे पहिले मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होते. पक्षांतरविरोधी कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल २०२० मध्ये विधानसभेचे सदस्य पदाच्या अपात्रतेला सामोरे जावे जावे लागले. २०२१ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत सेरछिपमधून पुन्हा त्यांनी निवडणूक जिंकून पुनरागमन केले. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत लालदुहोमा हे ZPM चे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

नवीन सरकारचा शपथविधी या महिन्यातच होणार : लालदुहोमा

झेडपीएमचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार लालदुहोमा म्हणाले की, 'मी उद्या किंवा परवा राज्यपालांना भेटेन. या महिन्यात नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. झेडपीएमने पूर्ण बहुमत मिळवले आहे. मिझोराम आर्थिक संकटाचा सामना करत आहे. हाच वारसा आपल्याला जाणाऱ्या सरकारकडून मिळणार आहे. आम्ही आमची वचनबद्धता पूर्ण करणार आहोत. आर्थिक सुधारणा आवश्यक आहेत आणि त्यासाठी आम्ही संसाधन एकत्र करणारी टीम तयार करणार आहोत.

६ पक्षांच्या युतीने ZPM ची स्थापना

झोराम पीपल्स मूव्हमेंट पार्टी सुरुवातीला सहा प्रादेशिक पक्षांची युती होती. ज्यामध्ये मिझोरम पीपल्स कॉन्फरन्स, झोरम नॅशनलिस्ट पार्टी, झोरम एक्सोडस मूव्हमेंट, झोरम डिसेंट्रलाइजेशन फ्रंट, झोरम रिफॉर्मेशन फ्रंट आणि मिझोराम पीपल्स पार्टी यांचा समावेश होता.
२०१८ मध्ये, ZPM ने याच आघाडीसह निवडणूक लढवली होती आणि आठ जागा जिंकल्या होत्या. यानंतर, निवडणूक आयोगाने (ECI) जुलै २०१९ मध्ये अधिकृतपणे पक्षाची नोंदणी केली. सर्वात मोठा संस्थापक पक्ष, मिझोराम पीपल्स कॉन्फरन्स, २०१९ मध्ये युतीतून बाहेर पडला आणि उर्वरित पाच पक्षांनी एकत्र येऊन ZPM नाव दिले.

५ राज्यांच्या निवडणूक निकालाचे आकडे?

मध्य प्रदेशात भाजपने २३० पैकी १६३ जागांवर विजय मिळवला तर काँग्रेस फक्त ६६ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थानमध्ये भाजपने १९९ जागांपैकी ११५ जागांवर विजय मिळवला, तर काँग्रेसला फक्त ६९ जागा मिळाल्या. छत्तीसगडमध्ये भाजपला ५४ आणि काँग्रेसला ३५ जागा मिळाल्या. ११९ पैकी ६४ जागा जिंकून काँग्रेसने तेलंगणातील बीआरएस सरकारची सत्ता संपुष्टात आणली. मिझोरममध्येही झोरम पीपल्स मूव्हमेंटने सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंटला धक्का देत भक्कम पाय रोवले आहेत.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT