Latest

मुंबईत उभे राहणार लष्करी संग्रहालय! जागा निश्चित करण्याचे निर्देश

दीपक दि. भांदिगरे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : भारतीय लष्कराच्या गौरवशाली आणि अभिनास्पद कामगिरीचे दर्शन घडवणारे, शौर्य, पराक्रम, धैर्य आणि संयमाच्या काळातील अनुभूतीची प्रचिती देणारे राज्य युद्ध स्मारक आणि लष्करी संग्रहालय मुंबईत उभारण्यात येणार आहे. या संग्रहालयासाठी तातडीने जागा निश्चित करण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बुधवारी दिले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने या संग्रहालयाचे काम वेगाने पूर्णत्वाला नेऊन येत्या १५ ऑगस्टपर्यंत यातील काही भाग नागरिकांसाठी सुरु करावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

वर्षा येथील समितीकक्षात झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, भारतीय लष्कराचे लेफ्टनंट जनरल एस. के. पराशर, ब्रिगेडियर डॉ. आचलेश शंकर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, नगरविकास विभागाचे प्रधानसचिव भूषण गगराणी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आई. एस. चहल यांच्यासह इतर उपस्थित होते.

सल्लागार आणि‍ डिझाईनर समितीची स्थापना

लष्करी संग्रहालय कसे असावे, यात कोणकोणत्या बाबींचा समावेश असावा हे निश्चित करण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांच्या सहभागासह एका सल्लागार आणि डिझाईनर समितीची स्थापना करण्यात यावी असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्या आणि देशाच्या रक्षणासाठी  सीमेवर प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या आपल्या जवानांप्रती अधिक माहिती मिळण्याच्यादृष्टीने या संग्रहालयात काही गोष्टींची अनुभूती घेता येईल अशीही व्यवस्था करण्यात यावी. बंकर कसे असतात, सियाचीनसारख्या ठिकाणी उणे डिग्री सेल्सीयसमध्ये आपले सैनिक कसे राहातात, जड शस्त्रास्त्रांसोबत घेऊन आपले सैनिक वाळवंटातून ते कसे चालतात, जंगलात त्यांचा वावर कसा असतो, यासारख्या गोष्टींची माहिती आणि अनुभव संग्रहालयाला भेट देणाऱ्या नागरिकांना मिळावा.

भारतीय लष्कराचे सामर्थ्य दर्शवणारी अनुभूती मिळावी

देशाचे लष्करी  सामर्थ्य आणि गौरव दर्शवणाऱ्या या संग्रहालयाच्या माध्यमातून तीनही सैन्य दलाच्या पराक्रमाच्या यशोगाथा, विविध युद्धांची माहिती, यात वापरण्यात आलेले शस्त्राशस्त्र आणि आयुध यासह तीन ही सैन्य दलामध्ये सहभागी असलेले महाराष्ट्रातील सैनिक, अधिकारी यांच्या पराक्रमाची माहिती, विविध युद्धात सहभागी होऊन शहीद झालेले राज्यातील सैनिक-अधिकारी, टँक, नौका, विमाने, पदके, लष्करी गणवेश, लष्करातील पदाधिकाऱ्यांचे रँक स्ट्रक्चर यासारख्या बाबी प्रदर्शित करण्यात याव्यात.
युद्धात उपयोगात येणारी विमाने, नौका, हेलिकॉप्टर्स, रणगाडे यांच्या उभारणीसह इतर बाबींच्या प्रतिकृती येथे असाव्यात. येथे भारतीय स्वातंत्र्याची सर्व ऐतिहासिक माहिती मिळावी, हे राज्य संग्रहालय होत असल्याने यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्करी कौशल्यांची माहिती, त्यांचे नौदल नियोजन याची माहिती देणारे दालन असावे.

ॲम्फी थिएटर, नागरी सुविधा, परमवीरचक्र, अशोक चक्र विजेत्यांची माहिती त्यांचा पराक्रम, त्यांचे मेडल्स अशी सर्व माहिती याठिकाणी मिळावी.

याठिकाणी एक ॲक्टीव्हिटी एरियाही तयार केला जावा. युवावर्गाला शारीरिक सुदृढतेसाठी काय करायला हवे. किमान सुरक्षिततेसाठी काय केले पाहिजे याची माहिती आणि मार्गदर्शन येथे मिळावे.  भारतीय लष्करात सहभागी होण्यासाठी युवकांना प्रेरणा मिळावी यादृष्टीने त्यांना यासाठी करावयाची तयारी, याचे प्रात्यक्षिक ज्ञान देणारे काही कोर्सेस सुरु करता येतील का याचाही विचार केला जावा.

एकूणच भारतीय लष्कराच्या सामर्थ्याची सर्वंकष माहिती मिळतांना या माध्यमातून नागरिकांना एक समृद्ध असा अनुभव मिळेल अशी व्यवस्था ही याठिकाणी असावी, असे ही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

ब्रिगेडियर डॉ. शंकर यांनी देशभरातील राज्य लष्कर संग्रहालयाची माहिती देणारे सादरीकरण यावेळी केले.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : #UPSCResult : ऑडिओ ऐकून केला अभ्यास | अल्पदृष्टी असणारा आनंद पाटील देशात 325 वा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT