Latest

मिलिंद नार्वेकर यांच्यासह काही आमदार संपर्कात : शिंदे गटाच्या आमदाराचा दावा

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांच्यासह इतर काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर चित्र स्पष्ट होईल, असा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आज (दि. २७) केला. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. यावेळी विधिमंडळ परिसरात ते पत्रकारांशी बोलत होते.

ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर हे आमदार नसतानाही सभागृहात बसल्याचे आढळून आल्याने चर्चांना उधाण आले आहे. याबाबत शिरसाट यांना विचारले असता मिलिंद नार्वेकरांनी सभागृहात जाण्यासाठी परवानगी घेतली असेल. पण अनेक वर्षांपासून त्यांची आमदार व्हायची इच्छा आहे. त्यामुळे ते आता मार्ग शोधत आहेत. उद्धव ठाकरे यांच्यापासून ते आता दूर जाऊ लागल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. लवकरात लवकर सभागृहात येण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असे शिरसाट म्हणाले.

दरम्यान, वर्षा बंगल्यावर राज्यातील कार्यकर्ता, शेतकरी, सामान्य नागरिक भेटायला येत असतो. ते चहा-पाण्याशिवाय जाऊ नये, अशी मुख्यमंत्र्यांची भावना आहे. आधीचे मुख्यमंत्री आमदारांनाही भेटतच नव्हते, त्यामुळे सर्वसामान्य जनतेला भेटण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणून त्यावेळी वर्षावरील खर्चही कमी होता, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चहा-पाण्याच्या खर्चावरून शिंदे सरकारवर केलेल्या टीकेवर दिली.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT