Latest

देवरांचा प्रवेश शिदेंसाठी फायदेशीर!

मोहन कारंडे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी खासदार मिलिंद देवरा यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. त्यांचा हा प्रवेश शिंदे गटासाठी फायदेशीर असून दक्षिण मुंबईतील शिंदे गटाची ताकद वाढणार आहे. देवरा यांच्या रूपाने शिंदे गटाला लोकसभा निवडणुकीसाठी तगडा उमेदवारही मिळाला आहे. याचा फायदा लोकसभेसाठीच नाही तर विधानसभा व मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीला होण्याची शक्यता आहे.

देवरा कुटुंबाचे दक्षिण मुंबईत सुरुवातीपासून वर्चस्व राहिले आहे. दिवंगत नेते मुरली देवरा यांनी ३० वर्षांपेक्षा जास्त काळ मुंबई काँग्रेसवर राज केले. गांधी कुटुंबाशी त्यांचे घरोब्याचे संबंध होते. मिलिंद देवरा व राहुल गांधी यांचीही घनिष्ठ मैत्री होती. त्यामुळे त्यांना खासदारकीच नाही, तर केंद्रीय राज्यमंत्रिपदही बहाल करण्यात आले होते. मुरली देवरा यांचे निधन झाले तेव्हा स्वतः सोनिया गांधी, प्रियांका गांधी व राहुल गांधी अंत्ययात्रेसह स्मशानभूमीत उपस्थित होते. यावरून त्यांच्यातील कौटुंबिक नाते किती घट्ट होते, हे स्पष्ट होते.

नंतर हे संबंध दुरावल्याचे दिसून येते. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून अचानक हटवल्यानंतर मिलिंद देवरा काँग्रेसपासून दुरावले होते. काँग्रेसच्या जाहीर कार्यक्रमालाही ते फारसे उपस्थित राहत नव्हते. देवरा भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा रंगली होती. मात्र, या चर्चेवर देवरा यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते हादरले असून भाजपसह ठाकरे गटाला आश्चर्याचा धक्का बसला आहे.

दक्षिण मुंबईत देवरा यांना मानणारा मोठा गट काँग्रेसमध्ये आहे. यात आजी-माजी आमदार, माजी नगरसेवकही आहेत. २००४ व २००९ मध्ये मिलिंद देवरा दक्षिण मुंबईतून खासदार म्हणून निवडून गेले होते. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला. तरी त्यांनी ३१.३६ टक्के मते बेतली होती. २०१४ मधील शिवसेना-भाजप युतीची जागावाटप लक्षात घेता, दक्षिण मुंबई मतदारसंघ शिवसेना (शिंदे गट) यांच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे देवरांची उमेदवारी निश्चित मानली जाते. यावेळी त्यांना भाजप व शिवसेनेची ताकदही मिळेल. काँग्रेसची पारंपरिक मतेही देवरांच्या पारड्यात पडू शकतात, याचा फायदा देवरांसह भाजप शिवसेनेलाही होऊ शकतो.

विधानसभेतील ताकद वाढणार

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात कुलाबा, मलबार हिल, मुंबादेवी, माझगाव, शिवडी, वरळी हे विधानसभा मतदारसंघ येतात. यातील प्रत्येकी दोन मतदारसंघात भाजप व शिवसेना ठाकरे गट तर प्रत्येकी एका मतदारसंघात काँग्रेस व शिंदे गटाचा आमदार आहे. आता देवरा यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसचे पाठबळ शिवसेनेला मिळणार आहे.

महापालिकेतही होऊ शकतो फायदा!

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात ३५ प्रभाग असून २०१७ मधील महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे सहा नगरसेवक (सर्व देवरा गटाचे) निवडून आले होते. याच निवडणुकीत भाजपचे १०, शिवसेना १६, तर सपा, मनसे व अखिल भारतीय सेनेचा प्रत्येकी एक नगरसेवक निवडून आला होता. शिवसेनेतील फुटीमुळे मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) यांचे मताधिक्य काही अंशी घटणार असून, याचा फायदा शिवसेना-भाजपला होऊ शकतो.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT