Latest

Meghalaya Election Result 2023 | मेघालयाची त्रिशंकू विधानसभेच्या दिशेने वाटचाल, संगमांचा ‘एनपीपी’ सर्वाधिक जागांवर आघाडीवर

दीपक दि. भांदिगरे

Meghalaya Election Result 2023 : मेघालय विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. प्राथमिक कलानुसार मेघालयची वाटचाल त्रिशंकू विधानसभेच्या दिशेने दिसत आहे. कॉनराड के संगमा यांच्‍या नेतृत्त्‍वाखालील नॅशनल पीपल्‍स पार्टी (एनपीपी) ने १७ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ भाजप ४, काँग्रेस २, टीएमसी ५, युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी ९ जागांवर आघाडीवर आहेत. दक्षिण तुरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड के संगमा यांनी त्यांच्या पक्षालाच बहुमत मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. "आम्हाला निकालांची चिंता नाही." अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

मेघालयात कोणत्‍याही पक्षाला बहुमत मिळणार नाही, असा दावा एक्‍झिट पोलमधून करण्‍यात आला आहे. मात्र संगमा यांच्‍या नेतृत्त्‍वाखालील नॅशनल पीपल्‍स पार्टीला (एनपीपी) सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज आहे. मेघालय विधानसभा निवडणुकीत एनपीपी, भाजप, काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह १३ राजकीय पक्ष निवडणूक रिंगणात आहेत. ३७५ उमेदवारांच्‍या भविष्‍याचा फैसला आज स्‍पष्‍ट होणार आहे. यामध्‍ये ३६ महिला उमेदवार आहेत. राज्‍यात भाजप आणि काँग्रेसने प्रत्‍येकी ६० उमेदवार उभे केले होते. तर तृणमूल काँग्रेस ५६ मतदारसंघात नशीब अजमावत आहेत.

संगमा यांच्‍या नेतृत्‍वाखालील एनपीपीने ५७ , युडीपीने ४६, एनचएसपीडीपीने ११, पीपल्‍स डेमोक्रॅटिक फ्रंटने ९ तर गण सुरक्षा पार्टीने १, गारो नॅशनल कौन्सिल दोन, जनता दल (युनायटेड) तीन उमेदवार उभे केले आहेत. एका जागेवरील उमेदवाराचा मृत्यू झाल्याने राज्‍यात ६० पैकी केवळ ५९ जागांवर मतदान झाले आहे. अशा स्थितीत या ५९ जागांचे निकाल लागत आहेत. उर्वरित जागेवर नंतर पोटनिवडणूक होणार आहे.

मेघालयमध्‍ये ६० विधानसभा मतदारसंघापैकी बहुमतांसाठी ३१ जागा जिंकणे आवश्‍यक आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता. काँग्रेसचे २१ उमेदवार विजयी झाले होते, तर संगमांच्या 'एनपीपी'चे २० उमेदवार विजयी झाले होते. मात्र, काँग्रेसला सर्वात मोठा पक्ष होऊनही सत्तेबाहेर राहावे लागले. भाजपसह इतर काही पक्षांनी 'एनपीपी'ला पाठिंबा देऊन सरकार स्थापन केले होते. (Meghalaya Election Result 2023)

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT