Latest

दिल्लीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप नेत्यांशी गाठीभेटी

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. दोन्ही नेत्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती दिली.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची आज (दि.९) सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्याच्या वतीने त्यांना विठोबा रखुमाईची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली. आषाढी एकादशीच्या एक दिवस आधी झालेल्या या भेटीत त्यांना सावळा विठुराया आणि रखुमाईची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली. यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी लागेल, ती मदत केंद्र सरकार नक्कीच करेल, असे दोन्ही नेत्यांना आश्वस्त केले.

दरम्यान, एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाच्या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सविस्तर चर्चा केल्याचे सांगितले जात आहे. गृह, महसूल, नगरविकास, सहकार खाती आपल्याकडे ठेवण्यास भाजप आग्रही असल्याचे समजते. तर दुसरीकडे सेनेचं हायकमांड दिल्लीत आहे, मुंबईत नाही. म्हणूनचं मुख्यमंत्री मुंबई सोडून दिल्लीत गेले आहेत, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT