Latest

‘मन की बात’ने ‘वास्‍तवातील भारता’ची ओळख करुन दिली : ‘आयआयएमसी’

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय रेडिओ कार्यक्रम 'मन की बात'ने देशवासियांना 'वास्तवातील भारत'ची ओळख करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे मत देशातील ७६ टक्‍के प्रसार माध्‍यम समूहांनी व्‍यक्‍त केल्‍याचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनने (आयआयएमसी) केलेल्या अभ्यासात म्हटले आहे.

असा झाला अभ्‍यास…

'आयआयएमसी'ने केलेल्‍या अभ्‍यासाबाबत माहिती देताना संस्‍थेचे महासंचालक प्रा. संजय द्विवेदी यांनी सांगितले की, संस्‍थेने १२ ते २५ एप्रिल या कालावधीमध्‍ये 'मन की बात' कार्यक्रमाचा प्रभाव यावर अभ्यास केला. यामध्‍ये ११६ माध्‍यम समूह, शैक्षणिक संस्‍था, विविध विद्यापीठांमधील माध्‍यमांशी संबंधित एकूण ८९० व्यक्ती, माध्‍यम संशोधक आणि माध्‍यम विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्‍ये ३२६ महिला आणि ५६४ पुरुष होते. यातील ६६ टक्‍के प्रतिसादकर्ते हे १८ ते २५ वयोगटातील होते. 'देशाबद्दलचे ज्ञान' आणि 'पंतप्रधानांची देशाबद्दलची दृष्टी' या दोन महत्त्‍वाच्‍या कारणांमुळे लोक हा कार्यक्रम ऐकण्यास प्रवृत्त होतात. तसेच 'मन की बात' मधील विविध मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींचे म्हणणे ऐकून ७६ टक्के प्रतिसादकर्त्यांना वाटते की ते लोकशाही प्रक्रियेत सहभागी आहेत.

नागरिकांवरील प्रभाव समजून घेण्‍याचा प्रयत्‍न

'मन की बात'मध्ये पंतप्रधानांनी कोणत्या मुद्द्यावर चर्चा केली होती, याचा लोकांवर सर्वाधिक प्रभाव पडला हे समजून घेण्याचाही या अभ्यासातून प्रयत्न झाला. यामध्‍ये असे आढळले की, ४० टक्के जणांना 'मन की बात'मधून शिक्षणाविषयी अत्‍यंत चांगली माहिती मळिाली. तर २६ टक्‍के लोकांनी तळागाळात झालेल्‍या नवीन संशोधनाची माहिती मिळल्‍याचे सांगितले. 'मन की बात'मध्ये चर्चा झालेल्या विषयांची माहिती लोक कोणाशी शेअर करतात हे समजून घेण्याचाही या अभ्यासात प्रयत्न करण्यात आला. ३२ टक्के प्रतिसादकर्त्यांनी सांगितले की ते कार्यक्रमात चर्चा केलेल्या मुद्द्यांवर त्यांचे विचार त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह सामायिक करतात, तर २९ टक्के लोकांनी सांगितले की, ते त्यांच्या मित्र आणि सहकाऱ्यांसोबत विषयांवर चर्चा करतात, असेही असेही प्रा. द्विवेदी यांनी स्‍पष्‍ट केले.

१२ टक्के लोक 'मन की बात' ऐकण्यासाठी रेडिओ, १५ टक्के टीव्‍ही तर ३७ टक्के इंटरनेटचा वापर करतात, असेही या अभ्‍यासात निदर्शनास आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रेडिओ कार्यक्रम 'मन की बात' 30 एप्रिल (रविवार) रोजी १०० वा भाग पूर्ण करणार आहे.पंतप्रधान या कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातून दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी रेडिओ कार्यक्रमाद्वारे देशाला संबोधित करतात. ३ ऑक्‍टोबर २०१४ रोजी मन की बात कार्यक्रमास प्रारंभ झाला होता.२२ भारतीय भाषा, २९ बोली भाषा आणि ११ आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये अनेक प्लॅटफॉर्मद्वारे हा कार्यक्रम प्रसारित केला जातो.

हेही वाचा :  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT