पुढारी ऑनलाईन : देशातील वाहन निर्मितीतील सर्वांत मोठी कंपनी असलेल्या मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड जानेवारी २०२३पासून वाहनांच्या किंमतीत वाढ करणार आहे. महागाई वाढत असल्याने सुट्या भागांच्या किंमती वाढत असल्याने दरवाढ अनिवार्य असल्याचे मारुतीने म्हटले आहे.
मारुती सुझुकीने या संदर्भातील पत्र शेअर बाजार नियंत्रकांसाठी लिहिलेले आहे. अर्थविषयक बातम्या देणाऱ्या मनीकंट्रोल या वेबसाईटने हे वृत्त दिले आहे.
पत्रात म्हटले आहे की, "महागाई वाढत असल्याने आणि कायदेविषय पुरतात करावी लागत असल्याने किमतीवरील दबाव वाढत आहे. किंमत नियंत्रणात ठेवण्यासाठी कंपनी आटोकाट प्रयत्न करत आहे. पण वाढलेत्या किंमतीचा भार ग्राहकांवर जाणे टाळता येणार नाही. त्यामुळे जानेवारी २०२३मध्ये किमतीत वाढ करण्याचे नियोजन कंपनीने केले आहे. वाहनांच्या मॉडेलनुसार ही वाढ वेगवेगळी असेल."
एप्रिल महिन्यात मारुतीने स्विप्ट आणि सीएनजीवरील वाहनांच्या किमती वाढवल्या होत्या. ही वाढ दिल्लीत १.३ टक्के इतकी होती. तर जानेवारी २०२१ आणि मार्च २०२२ या कालावधीमध्ये मारुतीने वाहनांच्या किमतीत ८.८ टक्के इतकी वाढ केलेली आहे. नोव्हेंबर २०२२पर्यंत गेल्या वर्षाची तुलना करता मारुतीच्या वाहन विक्रीत १४.४ टक्के इतकी वाढ झालेली आहे.