Latest

Marathwada Liberation Day : मनसे रझाकार आणि उरावर बसलेले आधुनिक ‘सजा’कार दोघांचा बंदोबस्त करेलच – राज ठाकरे

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन. (Marathwada Liberation Day) देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १४ महिन्यांनी मराठवाड्यात स्वातंत्र्याची खरी पहाट उघडली १७ सप्टेंबर १९४८ मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडियावर हैद्राबादच्या निजामाचा हेतू साध्य झाला असता, तर भारताचं अखंडत्वच धोक्यात आलं असतं. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे, आणि म्हणून खरं तर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन.  हा एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे! असं लिहित एक फोटो शेअर केला आहे. 

Marathwada Liberation Day :काय म्हणाले राज ठाकरे

वाचा जसेच्या तसे…

 सस्नेह जय महाराष्ट्र!

आज १७ सप्टेंबर, मराठवाडा मुक्ती संग्रामाचा दिवस. आजचा दिवस खरं तर संपूर्ण मराठवाड्यात उत्सवासारखा साजरा व्हायला हवा; कारण मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता. हैद्राबादच्या निजामाला हैद्राबाद हे स्वतंत्र राष्ट्रच हवं होतं आणि त्यासाठी त्याची कितीतरी वर्ष आधी तयारी सुरु होती. कल्पना करा की जर त्याचा हा हेतू साध्य झाला असता, तर भारताचं अखंडत्वच धोक्यात आलं असतं. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे, आणि म्हणून हा खरं तर आजचा दिवस, एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे.

मला असं एक नेहमी वाटतं, या इतक्या मोठ्या लढ्याबद्दल आपल्याकडे बऱ्यापैकी अनभिज्ञता आहे. मला अनंत भालेरावांचं या विषयावरचं पुस्तक वाचून लढ्याबद्दल काही गोष्टी कळल्या, मग पुढे नरहर कुरुंदकरांची या विषयावरची व्याख्यानं युट्युबवर ऐकताना नवीन माहिती मिळत राहिली. पण एकूणच असं वाटतं की या इतक्या गौरवशाली लढ्याबद्दल फारसं कोणाला माहित नाही.

माझं तर म्हणणं आहे की आता जे नवं शिक्षण धोरण येतंय, त्यानुसार त्या त्या राज्यातील पुसून टाकला गेलेला इतिहास शिकवला जाणार आहे. त्यामुळे आता मराठवाडा मुक्ती संग्रामाचा विस्तृत इतिहास पाठयपुस्तकांमध्ये शिकवला गेला पाहिजे. संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा, हे महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने कदापि विसरता कामा नये.

पण मराठवाडा मुक्तिसंग्रामाविषयी फारसं बोललं का जात नसेल? अर्थात रझाकारांचं लांगुलचालन करण्यात धन्यता मानणाऱ्यांचं सरकार कित्येक वर्ष राज्यात होतं, त्यामुळे हे होणं स्वाभाविक होतं. पण सध्या याच रझाकारांची पुढची औलाद, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या सोहळ्यात सामील व्हायला नकार देते, आणि दुर्दैव असं की माझ्या संभाजीनगरकरांच्या उरावर ही असली घाण येऊन बसली आहे.

बरं, संभाजीनगरकरांच्या उरावर फक्त रझाकारच नाहीयेत तर आधुनिक 'सजा'कार पण येऊन बसलेत. गेली कित्येक वर्ष संभाजीनगर महापालिकेच्या खुर्चीत बसून लूट करणारे आणि रोज संभाजीनगरकरांना शिक्षा भोगायला लावणारे 'सजा'कार अर्थात लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना रझाकार आणि 'सजा'कार या दोघांचा बंदोबस्त करेलच. असो, आजच्या मुक्ती संग्राम दिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा. आणि माझं मराठवाड्यातील जनतेला आवाहन आहे की तुम्ही जो लढा दिलात तो देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील गौरवशाली लढा आहे, त्याचं विस्मरण होऊ देऊ नका. आधुनिक रझाकारांच्या विरोधातील लढ्यात हाच इतिहास आपल्याला बळ देणार आहे.

आपला नम्र, राज ठाकरे

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT