स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि मराठवाडा मुक्ती दिन

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि मराठवाडा मुक्ती दिन

Published on

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगिरी किल्ल्यावर भारत माता मंदिराच्या प्रांगणात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्रामातील शहीदांना अभिवादन करण्यासाठी 'सामूहिक वंदे मातरम' गायन होणार आहे. त्यानिमित्त…

ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरदेखील देशाचा काही भाग पारतंत्र्यात होता. हैदराबादचा निजाम भारताच्या विभाजनाची आग्रही भूमिका घेऊन पाकिस्तानप्रमाणे स्वतंत्र राष्ट्राची मागणी करत होता. परंतु, हैदराबादसह मराठवाड्यातील जनतेच्या एकजुटीने आणि लोकशाही स्वीकारलेल्या भारतात सामील होण्याच्या जिद्दीने निजामाला गुडघे टेकण्यास भाग पाडले आणि मराठवाडा भारताचा अविभाज्य भाग झाला. देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळात 565 संस्थानांपैकी हैदराबाद, जम्मू व काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने स्वतंत्र भारत देशाचा भाग होण्याचे स्वप्न पाहत होती. निजामाच्या राजवटीतील हैदराबाद हे एक मोठे संस्थान होते. मराठवाडा प्रदेश हैदराबाद संस्थानातील महत्त्वाचा भाग होता.

हैदराबाद संस्थानात तेलंगणा, मराठवाडा व कर्नाटक राज्याचा काही भाग होता. स्वातंत्र्याच्या एक वर्षानंतरच्या काळात मराठवाडा आतून धगधगत होता. यातून या संग्रामाला स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाचे नेतृत्व लाभले आणि मराठवाडा मुक्तीचा लढा सुरू झाला. निजाम अत्यंत महत्त्वाकांक्षी होता. त्याने कट्टरपंथी कासीम रिजवीच्या नेतृत्वाखाली 'रझाकार' नावाने एक क्रूर अर्धसैनिक दल स्थापन केले होते. या दलाने तेथील बहुसंख्याक हिंदूंवर अत्याचार करताना क्रौर्याची परिसीमा गाठली होती. देशाचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभाई पटेल यांनी हैदराबाद मुक्तीची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्यांच्या द़ृष्टीने काश्मीरप्रमाणेच हैदराबाददेखील महत्त्वाचे संस्थान होते. त्यामुळेच हैदराबाद स्वतंत्र होणे हे त्यांच्यासाठी एकसंघ भारताचे स्वप्न सत्यात उतरण्यासारखे होते. हैदराबादमध्ये लष्करी कारवाईने हस्तक्षेप करावा लागणार याची सरदार पटेलांना सुरुवातीपासूनच कल्पना होती. निजाम शरण येत नाही, त्या उलट सामान्य जनतेवरील अन्याय वाढले आहेत, हे लक्षात येताच भारताच्या प्रशासनाने 13 सप्टेंबर 1948 रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई करण्यास सुरुवात केली.

परंतु, या मोहिमेला 'लष्करी कारवाई' न म्हणता 'पोलीस अ‍ॅक्शन' म्हणावे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुचवले होते आणि त्याप्रमाणेच या कारवाईस संबोधण्यात आले. 'ऑपरेशन पोलो'च्या माध्यमातून निजामाच्या अन्यायी व जुलमी मानसिकतेला भारतीय लोकशाही मार्गाची परिभाषा समजावून सांगण्यात आली. भारतीय सैन्याने मराठवाड्यासह हैदराबाद संस्थानात सैनिकी कारवाया करण्यास सुरुवात केली. मराठवाड्यातील जनतेसाठी गुलामगिरीची सावली नष्ट करण्याचा हा काळ होता. 9 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबादवर चढाई करण्याचे आदेश सैन्य दलाला देण्यात आले. ले. जनरल राजेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली मेजर जनरल जयंत चौधरी, डी. एस. ब—ार, ए. ए. रुद्र यांनी ही योजना राबविली. 13 सप्टेंबरच्या सकाळी कारवाईस सुरुवात झाली. पाच विविध ठिकाणांवरून सैन्य संस्थानात शिरले. मुख्य चढाई सोलापूरहून सुरू झाली. विजयवाडा, कुर्नुल, आदिलाबाद, चाळीसगावमार्गे छत्रपती संभाजीनगरकडून (औरंगाबाद), वाशिममार्गे हिंगोलीकडून अशा विविध मार्गांनी भारतीय फौजा संस्थानात घुसल्या आणि एकापाठोपाठ एक भाग काबीज होत गेला. पोलीस कारवाई सुरू होताच पुढील काही दिवसांत भारतीय सेनेने हैदराबाद संस्थानामधील सर्व महत्त्वाच्या केंद्रावर ताबा मिळवला. मराठवाड्याच्या गावागावांत हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी पुढाकार घेतला.

हैदराबाद मुक्ती संग्राम सुरू झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रिजवी याचे जनतेवर अनन्वित अत्याचार सुरूच होते. परंतु, दुसर्‍या बाजूला मुक्ती संग्राम लढा वेगात सुरू होता. सर्वसामान्य जनतेत राहून गनिमी कावा करून अथवा प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून अनेक नेत्यांनी या लढ्याचे नेतृत्व केले. ज्यामध्ये स्त्री, पुरुष, युवक, ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला. या सर्वांमध्ये स्वामी रामानंद तीर्थ, दिंगबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, शंकरसिंग नाईक, विजयेंद्र काबरा, बाबासाहेब परांजपे यासारख्या असंख्य नेत्यांनी लढ्याचे नेतृत्व केले. मराठवाड्यात निजामाच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशिनाथ कुलकर्णी, मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई अशी ओळख निर्माण झालेल्या बदनापूर तालुक्यातील दगडाबाई शेळके, बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्र जाधव, नळदुर्ग सर करणारे धाराशिव जिल्ह्यातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर, परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार, विनायकराव चारठाणकर, विश्वनाथराव कातनेश्वरकर, नांदेडचे देवराव कवळे, जीवनराव बोधनकर आदींच्या रूपाने मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील गावागावांत हा लढा लढला गेला. त्याचप्रमाणे श्रीधर वर्तक, जानकीलाल राठी, शंकरराव जाधव, किशनसिंग राजपूत, गोविंदराव पानसरे, बहिर्जी बापटीकर, राजाभाऊ वाकड, विश्वनाथ भिसे, जयंतराव पाटील यासारख्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता भारतात विलीन होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. भारत देशाच्या अधुर्‍या स्वातंत्र्याला पूर्णत्व प्राप्त झाले. मराठवाडा स्वतंत्र भारत देशाचा अविभाज्य भाग झाला.

तेलगू भाषिक तेलंगणा, मराठी भाषिक मराठवाडा आणि कन्नड भाषिक कर्नाटकचा काही भाग असलेले हैदराबाद संस्थान अवघ्या 4 ते 5 दिवसांत भारतात विलीन झाले. अवघ्या काही तासांत निजाम शरण आला. याचे जेवढे श्रेय तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना जाते, तेवढेच श्रेय मराठवाड्यातील जनतेलादेखील जाते. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्यावरील भारत माता मंदिराच्या प्रांगणात, मराठवाडा मुक्ती संग्रामातील शहीद स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यासाठी 'सामूहिक वंदे मातरम' गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. दि. 17 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मराठवाडा मुक्ती संग्रामातील क्रांतिविरांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन पर्यटन विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

– मंगल प्रभात लोढा
(पर्यटनमंत्री, महाराष्ट्र राज्य)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news