Latest

Manoj Jarange Patil : मराठ्यांना फसवाल तर याद राखा; जरांगे पाटलांचा जुन्नरमध्ये इशारा

अमृता चौगुले

नारायणगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सरकारने मराठा समाजाला फसविण्याचा प्रयत्न केला तर याद राखा असा इशारा देत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी सकल मराठा समाजाशी संवाद साधताना ते बोलत होते.
जरांगे-पाटील म्हणाले की, सरकारने आरक्षणाचा निर्णय चार दिवसात घ्यावा अन्यथा त्या पुढे होणारे आंदोलन सरकारला पेलणार नाही व झेपणार नाही. मनोज जरांगे पाटील जुन्नर येथे गुरुवारी मुक्कामी आले होते.

संबंधित बातम्या :

शुक्रवारी सकाळी त्यांनी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन शिव जन्मभूमीवर नतमस्तक होऊन शिवनेरीची माती कपाळी लावली. शिवाई मातेचा आशीर्वाद घेऊन ते शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी आल्यावर पंच रस्त्यावर शिवाजी महाराज पुतळ्या जवळ सकल मराठी समाजाशी त्यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाज आता एकवटला आहे. सरकारला मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावेच लागेल. सरकारने आरक्षण देण्यासाठी तीस दिवस मागितले होते. आपण त्यांना दहा दिवस वाढवून दिले आहेत. या चाळीस दिवसांची मदत समाप्त होण्यास चार दिवस बाकी आहेत. निर्णय घेतला नाही तर याद राखा पुढील आंदोलन सरकारला पेलणार नाही व झेपणार नाही.

मराठी बांधवानी आता आपआपल्या भागातील मराठी घरात जाऊन जनजागृती करावी, आरक्षणाची आपल्याला गरज का आहे ते सगळ्यांना समजून सांगावे आरक्षण मिळावे म्हणून कोणीही आत्महत्या करू नये असे आवाहन करून मनोज जरांगे म्हणाले की आता माघार नाही आरक्षण घेल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही २४ तारखेला मराठा आरक्षण मिळाल्याची विजयी रॅली निघेल अन्यथा माझी अंत्ययात्रा निघेल असे ते म्हणाले.

मराठी बांधवानो आता गाफिल राहू नका आपल्या आंदोलनला नक्की यश मिळेल.अभी नही तो कभी नही या भावनेने सगळे सोबत राहा. ताकदीने तयार राहा. मराठा समाजाला कसं मिळत नाही हे मी पाहतो. २२ तारखेला मी पुढील नियोजन सांगतो.आपले आंदोलन हिंसक होणार नाही यांची काळजी घ्या. आरक्षण घेतल्या शिवाय तुमचं हे पोरगं एक इंचही मागे हटणार नाही असे जरांगे पाटील यांनी सांगितले.
जुन्नर येथे जरांगे पाटील यांचे जेसीबीने फुले उधळत स्वागत केले. यावेळी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. शाळकरी मुले – मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते. जरांगे यांचे स्टेजवर मुलींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी जुन्नरचे आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे,विघ्नहर साखर कारखाना अध्यक्ष सत्यशील शेरकर, शिवसेना (उबाठा )तालुका प्रमुख माऊली खंडागळे आदी उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उप विभागीय अधिकारी रवींद्र चौधर, पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT