Latest

Manoj Jarange Patil : पवारांच्या बालेकिल्ल्यात जरांगे पाटलांचा आवाज घुमणार

अमृता चौगुले

बारामती : पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलनाचे हत्यार उपसत राज्यभर रान उठविणारे मनोज जरांगे पाटील शुक्रवारी (दि. २०) बारामतीत येत आहेत. येथील तीन हत्ती चौकात त्यांची सभा होणार असून, या सभेला उच्चांकी गर्दी होण्याची शक्यता आहे. बारामतीतील सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ही माहिती देण्यात आली.

मराठा समाजाने गेली तीन दिवसांपूर्वीच बैठक घेत बारामतीत मनोज जरांगे पाटील यांची सभा घेण्याचे नियोजन केले होते. त्याला यश आले असून, शुक्रवारी जरांगे पाटील बारामतीत येत आहेत. 'तुम्ही तयारीला लागा… गर्दीचा विषय आम्ही बघतो' हे घोषवाक्य घेत मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची बारामतीत तयारी केली जात आहे. मराठा समाजातील युवक-युवती स्वयंस्फूर्तीने या कार्यक्रमासाठी पुढे येत आहेत. अनेकांनी स्वयंसेवक पदाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील सभेने आजवरचे सगळे रेकाॅर्ड मोडीत काढले आहेत. आता ते राज्यभर दौरे करीत मराठा आरक्षणाचा आग्रह धरत आहेत. मराठा समाजाचा त्यांना मोठा पाठिंबा मिळतो आहे. बारामती हे राज्यातील महत्त्वाचे राजकीय केंद्र आहे. अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्यानंतर बारामतीत विराट मोर्चा काढत मराठा समाजाने निषेध नोंदवला होता. दि. १४ ऑक्टोबरच्या सभेलाही बारामतीतून अनेक जण गेले होते. या पार्श्वभूमीवर आता जरांगे पाटील बारामतीत येत आहेत.

शहरातील तीन हत्ती चौक येथे शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता त्यांची सभा होणार आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर पेटला आहे. आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात असताना जरांगे पाटील यांची बारामतीत सभा होत आहे. या सभेकडे शहर व तालुक्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT