Latest

Manoj Jarange-Patil: मतदान करताना आपली लेकरं डोळ्यासमोर ठेवा: जरांगे-पाटील

अविनाश सुतार

वडीवली, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांनी आज (दि. २६) अंबड तालुक्यातील गोरी गंधारी या गावात मतदानाचा हक्क बजावला. एक नागरिक म्हणून मी कर्तव्य बजावले. मात्र, मतदान करताना आपले लेकरं डोळ्यासमोर ठेवा, असे आवाहन जरांगे- पाटील यांनी समाजाला केले. Manoj Jarange-Patil

मनोज जरांगे पाटील यांची मराठवाड्याच्या संवाद दौऱ्यादरम्यान धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथे तब्येत बिघडली होती. त्यांच्यावर गेल्या दोन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी सुपर स्पेशलिटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज लोकसभा निवडणुकीसाठी मतदान असल्याने ते रुग्णवाहिकेत उपचार घेत मतदानासाठी गोरी गंधारी येथे आले. आपला मतदानाचा हक्क बजावून ते परत पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले. Manoj Jarange-Patil

जरांगे- पाटील पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, सगे सोयरेच्या अंमलबजावणीच्या बाजूने समाजाने मतदान करावे. या वेळेस पाडणारे बना. ६ जूनपर्यंत आरक्षण दिले नाही, तर समाजाने आरक्षण देणारे बनावे. राजकारण माझा मार्ग नाही. परंतु, तुम्ही जर मला त्या वाटेवर न्यायला लागले, तर माझा नाईलाज आहे. विधानसभेला ताकतीने लढू. महाराष्ट्रात ९२ मतदारसंघात मराठ्यांचे वर्चस्व आहे. पाडण्यातही खूप मोठी ताकद आहे. अशा ताकदीने पाडा की त्यांच्या पाच पिढ्या उभ्या राहिल्या नाही पाहिजेत, असे सांगून एक महिन्यापासून आम्ही सर्व मतदार संघात विधानसभेची तयारी सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

समाजाने मतदान करायला पाहिजे, मतदान आपला अधिकार आहे. मतदान लोकशाहीचा उत्सव आहे. मला फुफ्फुसाचा त्रास आहे. तरी मी मतदान करण्यासाठी आलो आहे. नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले. कोणाला मतदान करा, कोणाला करू नका, मी काहीच बोलणार नाही. परंतु, तो उमेदवार सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करणारा पाहिजे, ते म्हणाले.

निवडणुकीसाठी माझा फोटो किंवा आंदोलनाचा फोटो तुम्ही वापरू नका.

लोकसभा निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांना मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला आहे की. माझा फोटो किंवा आंदोलनाचा फोटो तुम्ही वापरू नका. तुमच्या फायद्यासाठी तुम्ही समाजाचे नाव पुढे करू नका. मराठा आरक्षणाचे नाव पुढे करून निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना त्यांनी इशारा दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज प्रकाश आंबेडकर यांना सहकार्य करावे. त्याचबरोबर छत्रपतींच्या दोनही राज घराण्यांचा समाजाने सन्मान केला पाहिजे. हे माझे वैयक्तिक मत असल्याचे जरांगे यावेळी म्हणाले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT