Latest

Manoj Jarange Patil: दगा फटका परवडणार नाही, म्हणूनच शनिवारपासून पुन्हा उपोषण: जरांगे-पाटील

अविनाश सुतार

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा: सगे सोयऱ्यांच्या कायद्याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट नाही, त्यामुळे उद्यापासून (दि.१०) आपण पुन्हा आमरण उपोषण करणार आहे, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांनी आज (दि.९) राज्य सरकारला दिला. सरकारकडून होणारा दगा फटका समाजाला परवडणार नाही, म्हणून आपण आमरण उपोषण करणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.
जरांगे- पाटील आज बीड आणि अहमदनगर जिल्हाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते रात्री श्रीगोंदा येथील जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. या दौऱ्यावर निघण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. Manoj Jarange Patil

ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या कुटुंबीयांना प्रमाणपत्र वाटप करण्यात यावे. ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत, त्यांच्यासाठी सगे सोयऱ्यांचा कायदा आहे. त्या कायद्याची अंमलबजावणी होऊन प्रमाणपत्र वाटप झाले पाहिजे. सगे सोयऱ्यांच्या कायद्याबाबत सरकारची स्पष्ट भूमिका नाही. सरकारकडून होणारा दगा फटका समाजाला परवडणार नाही, म्हणून आपण आमरण उपोषण करतोय. Manoj Jarange Patil

मी उपोषणाला बसणार म्हटल्यावर अंतरवाली सराटीसह राज्यात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया गुरूवारपासून सुरू झाल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिल्याचे जरांगे यांनी सांगितले. कोपर्डी खटल्याचा विषय तसाच आहे. हैद्राबादचे गॅझेट, सातारा संस्थान व बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅझेट सरकारने घेतलेले नाही. १५ तारखेला अधिवेशन आहे. त्याआधी ही प्रक्रिया १० तारखेपासून सुरू होणे अपेक्षित आहे.

या उपोषणाआधी अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची महत्वाची बैठक होईल. त्यानंतर १० वाजल्यापासून आमरण उपोषणाला सुरूवात होईल. या उपोषणादरम्यान आपण पाणी व औषधोपचार घेणार नसल्याचेही जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.

यावेळी जरांगे यांनी राष्ट्रवादीचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. "मला चॅलेंज देऊ नको, गप्प बस, पाटील असल्यानेच ओबीसीत घुसून आरक्षण घेवून दाखवलं, गोर गरिबांचे वाटोळ करु नको, तुला लोकांचे वाटोळे करायचे असेल, पण मला ते करायचे नाही. तू असाच बरळत बसला, तर नाईलाजाने मला चॅलेंज करावे लागेल," असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT